दूरध्वनीचा वापर कमी झाल्यामुळे रस्ते आणि पदपथांवर असलेल्या अपंग संचालित दूरध्वनी केंद्रांवरही ग्राहक कमी संख्येत येतात. त्यामुळे या दूरध्वनी केंद्रांवर आता लॉटरीची तिकिटे, पॅकबंद खाद्यपदार्थ, शीतपेये, इमिटेशन ज्वेलरी आदी विविध वस्तू मिळणार आहेत. महापालिकेतर्फे लवकरच अपंगांविषयीचे धोरण जाहीर केले जाणार असून त्यात हे ठरविण्यात आले असल्याची माहिती एका प्रसिद्धिपत्रकात देण्यात आली आहे.

शिवसेना अपंग साहाय्य सेना आणि अपंगांच्या अन्य संघटनांनी महापालिका मुख्यालयात नुकतीच महापौर स्नेहल आंबेकर यांची भेट घेतली आणि अपंगांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. महापालिकेतर्फे अपंगांना दूरध्वनी केंद्रे दिली जातात. मात्र ज्याला हे केंद्र चालवायला दिले असेल त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ते केंद्र अन्य अपंग व्यक्तीकडे हस्तांतरित होण्यास विलंब होणे, अपंग व्यक्तीने भाडे थकवले तर त्याच्या केंद्राचा परवाना रद्द करणे, आदी आणि अन्य प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
महापालिका सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, अतिरिक्त महापालिका आयुक्त पल्लवी दराडे, उपायुक्त किशोर क्षीरसागर, अन्य अधिकारी शिवसेना अपंग साहाय्य सेनेचे सूर्यकांत लाडे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. अपंगांच्या दूरध्वनी केंद्रांची गणना अन्य फेरीवाल्यांमध्ये करू नये, ‘बेस्ट’मध्ये अंधांप्रमाणे अपंगांनाही सवलत द्यावी, अपंगांसाठीचे धोरण तातडीने तयार केले जावे, अशा सूचना या वेळी संघटनेकडून करण्यात आल्या. महापालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी अपंगांसाठी तरतूद केली जाते त्याचा विनियोग कसा केला जातो, त्याचा अहवाल सादर केला जावा, असे आदेश महापौर आंबेकर यांनी प्रशासनाला दिले असल्याचेही या पत्रकात म्हटले आहे.