पश्चिम किनाऱ्यावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे कोकण परिसरात पावसाने पुन्हा जोर धरला असून मुंबईतही रविवारी पावसाच्या जोरदार सरी आल्या. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर कायम राहणार असून मुंबईसह कोकण परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज वेधशाळेने नोंदवला आहे.
शनिवारी दुपारपासून कोकण परिसरात पावसाच्या मुसळधार सरी सुरू झाल्या. हण्र येथे सर्वाधिक १७० मिमी पावसाची नोंद झाली. रत्नागिरी, दापोली, मुरुड, श्रीवर्धन येथे १५० मिमीहून अधिक पाऊस पडला, तर गुहागर, लांजा, रोहा, चिपळूण, मंडणगड, मालवण, खेड आणि गगनबावडा या ठिकाणी १०० मिमीहून अधिक पाऊस झाला. पावसाचा हा जोर रविवारीही कायम राहिला. रविवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत सांताक्रूझ येथे ४० मिमी, तर कुलाबा येथे ८० मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी रात्री ८.३० वाजेपर्यंतच्या बारा तासांत सांताक्रूझ येथे ५०.७ मिमी, तर कुलाबा येथे ४९ मिमी पाऊस पडला.  मुसळधार पावसाच्या सरी आणखी किमान तीन दिवस सुरू राहणार आहेत. ३ सप्टेंबपर्यंत दक्षिण व उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ येथे काही भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वेधशाळेने नोंदवला आहे.  
ऑगस्ट सरासरीखालीच
जुलै आणि ऑगस्ट हे पावसाचे मुख्य महिने मानले जातात. पावसाळ्याच्या मोसमातील ७० टक्के पाऊस या दोन महिन्यांत पडतो. जुलै महिन्यात सरासरी ७९९ मिमी, तर ऑगस्टमध्ये सरासरी ५२९ मिमी पाऊस पडतो. मात्र या वेळी जुलैच्या अखेरच्या आठवडय़ात बरसणाऱ्या पावसाने ऑगस्टमध्ये विश्रांती घेतली. १ ते ३१ ऑगस्टदरम्यान मुंबईत सांताक्रूझ येथे ३७० मिमी, तर कुलाबा येथे ३७८ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र जुलै महिन्यातील मुसळधार पावसामुळे शहरातील पावसाची सरासरी चांगली आहे. आतापर्यंत मुंबईत वर्षांच्या सरासरीपेक्षा ८० टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या वेळेपर्यंत ९० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला होता.
विहार तलावही भरला
शनिवारपासून पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे विहार तलाव रविवारी भरून वाहू लागला. या तलावाची क्षमता २७,६९८ दशलक्ष लिटर आहे. तलावातील पाण्याचा उपयोग औद्योगिक वापरासाठी केला जातो. शहराला पाणीपुरवठा करणारे तुळशी (२८ जुलै), मोडकसागर (३० जुलै), तानसा (४ ऑगस्ट) आणि मध्य वैतरणा (२० ऑगस्ट) हे तलाव यापूर्वीच भरून वाहू लागले आहेत.  भातसा तलावात सध्या ६ लाख ६१ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा असून या तलावाची क्षमता ७ लाख १७ हजार दशलक्ष लिटर आहे.