संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी अफजल गुरूला फाशी दिल्यानंतर मुंबईत सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबईत पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. परंतु कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. काही ठिकाणी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला, तर सर्वसामान्य जनतेने समाधानाची भावना व्यक्त केली.
दिल्लीच्या तिहार जेलमध्ये शनिवारी सकाळी अफझल गुरुला फाशी दिल्याची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर मुंबईत त्वरित सतर्कतेचा इशारा देण्यात आला. सर्व पोलीस उपायुक्तांना आपापल्या हद्दीत राहण्याचे आदेश देण्यात आले. तर मुंबईच्या प्रत्येक संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त अंबादास पोटे यांनी सांगितले.
शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, बॉम्ब शोधक पथकांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील महत्त्वाच्या नाक्यांवर आणि चौकामध्येही पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. रेल्वे स्थानकातही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून प्रवाशांची तपासणी करण्यात येत होती. अतिरेकी अबू जिंदाल सध्या आर्थर रोड कारागृहात असल्याने तेथील सुरक्षाही वाढविण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
खारदांडा येथे शिवसेनेने, तर मोहम्मद अली रोड परिसरात मिठाई वाटून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. मोहम्मद अली रोडवरील मिनार मशिदीजवळ अफजल गुरुच्या प्रतिमेचे दहन करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. फेसबुक आणि ट्विटरवर या निर्णयाचे स्वागत आणि अभिनंदन करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.