हिंदुत्ववाद म्हणजे धर्म नव्हे आणि शिव, हनुमान आणि दुर्गादेवी या विश्वातील महाशक्ती आहेत आणि ते विशिष्ट धर्माचे प्रतिनिधित्व करीत नाहीत, असे मत महाराष्ट्रातील प्राप्तिकर लवादाने व्यक्त केले आहे.
हिंदू दैवतांची पूजा करणे आणि मंदिराची देखभाल करणे यांचा धार्मिक कृत्ये म्हणून विचार करता येणार नाही, असे प्राप्तिकर अपीलेट लवाद, नागपूरने आपल्या अलीकडेच दिलेल्या एका आदेशात म्हटले आहे.
तांत्रिकदृष्टय़ा हिंदुत्ववाद हा धर्म नाही किंवा हिंदू हे धार्मिक समाज स्थापन करू शकत नाही. त्यामुळे शिव, हनुमान किंवा दुर्गादेवी यांची पूजा करणे आणि मंदिरांची देखभाल करणे यासाठी येणाऱ्या खर्चाला धार्मिक उद्देशासाठीचा खर्च म्हणून गणता येणार नाही. त्यांना केवळ विश्वातील महाशक्ती म्हणून संबोधता येईल, असेही लवादाने म्हटले आहे.
शिवमंदिर देवस्थान कमिटी संस्थानाने पाच टक्क्य़ांहून अधिक खर्च धार्मिक विधींसाठी खर्च केला असल्याने त्याबाबत सवलत द्यावी, अशी विनंती ट्रस्टने प्राप्तिकर आयुक्त, नागपूर यांच्याकडे केली होती. ती मान्य करण्यास आयुक्तांनी नकार दिल्याने त्याविरुद्ध लवादाकडे दाद मागण्यात आली होती. त्यावर लवादाचे सदस्य पी. के. बन्सल आणि न्यायिक सदस्य डी. टी. गरासिया यांनी वरील आदेश दिला.

शिव, हनुमान किंवा दुर्गादेवी यांची   पूजा करणे आणि मंदिरांची देखभाल करणे यासाठी येणाऱ्या खर्चाला धार्मिक उद्देशासाठीचा खर्च म्हणून गणता येणार नाही.