04 March 2021

News Flash

राणीबागेतील पाणघोडय़ाचे बारसे लांबणीवर

कावळ्यांकडून हल्ले होऊ नये म्हणून हे पिल्लू सदैव आईच्या अवतीभवती पाण्यात डुंबत असते.

लिंगनिश्चिती होत नसल्याने कर्मचारी संभ्रमात; आणखी तीन महिन्यांची प्रतीक्षा

भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात (राणीबाग) आठवडय़ापूर्वी जन्मलेल्या पाणघोडय़ाच्या पिल्लाच्या नामकरणावरून अवघे प्रशासन संभ्रमात पडले आहे. २४ तास आईच्या सोबत पाण्यातच असलेले हे पिल्लू नर आहे की मादी हे ओळखणे कठीण बनले आहे. तर पिल्लाची आई कोणालाच त्याच्याजवळ फिरकू देत नसल्याने आता लिंगनिश्चिती कशी करायची, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.

जिजाबाई भोसले उद्यानात शिल्पा आणि देवा या पाणघोडय़ांच्या जोडीपासून गेल्या आठवडय़ात एक पिल्लू जन्माला आले होते. हे या पाणघोडय़ांचे दूसरे पिल्लू आहे. मात्र या नवीन पाणघोडय़ाची लिंगनिश्चिती होत नसल्याने तो नर आहे की मादी हे ओळखणे कठीण होऊन गेले आहे. कावळ्यांकडून हल्ले होऊ नये म्हणून हे पिल्लू सदैव आईच्या अवतीभवती पाण्यात डुंबत असते. पाणघोडय़ांचे जन्मानंतर लिंग पोटातच असल्याने त्याची नेमकी ओळख करणे कठीण होत असते. त्याच्या चाचणीसाठी त्या पिल्लाला मादीपासून वेगळे करणे गरजेचे असते. मात्र मादी थोडी रागीट असल्याने ती कोणालाही या पिल्लाजवळ फिरकू देत नाही. त्यामुळे या पिल्लाचे काय नामकरण करायचे, असा प्रश्न उद्यानातील कर्मचाऱ्यांना पडला आहे. या पिल्लाला किमान दीड महिने मातेपासून वेगळे करता येणार नाही, असे उद्यानाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

राणीच्या बागेत दोन महिन्यांपूर्वी हरणीने आपला पाळणा हलविल्यानंतर शिल्पा या पाणघोडीनेही एका पिल्लाला जन्म दिला. त्यामुळे पाणघोडय़ांची बागेतील संख्या आता चार इतकी झालेली आहे.

पिल्लू आईला सोडून कुठे जात नसल्याने त्याच्या लिंग निश्चितीत अडथळा येत आहे. या पिल्लाला तीन महिने त्याच्या मातेचे दूध प्यावे लागेल, यानंतर त्याला भुसा, गाजर, हिरवे गवत आदीचा आहार दिला जाईल.

– डॉ. संजय त्रिपाठी, संचालक, वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 2:15 am

Web Title: hippopotamus naming ceremony in rani baug
Next Stories
1 ‘टोचन’पायी गाडय़ांचे ‘शोषण’ थांबणार!
2 लाभदायी गुंतवणुकीची गुरुकिल्ली
3 अग्निशमन दलात यंत्रसामग्री खरेदीत घोटाळा?
Just Now!
X