शिवचरित्राचे लेखन व संशोधन करताना इतिहासाशी किंवा अचूकतेशी कधीही प्रतारणा केली नाही आणि इतिहासाचा अवमान कुणीही करू नये, असे ठामपणे सांगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी टीकाकारांना अप्रत्यक्षपणे सुनावले. राज्य सरकारचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार बुधवारी शिवशाहीर पुरंदरे यांना समारंभपूर्वक देण्यात आला तेव्हा त्यांनी आपल्या शिवप्रेमाने अवघे वातावरण भारून टाकले.
इतिहासाचा कोणत्याही प्रकारे अवमान होऊ नये, असे मत व्यक्त करून संगीत, नाटक, कादंबरी, ललित साहित्यातून इतिहास मांडताना ‘अभ्यासोनी प्रकटावे’, असा कानमंत्रही बाबासाहेबांनी दिला. केवळ कपाटात ठेवण्यासाठी ग्रंथभांडार न लिहीता शिवचरित्र खेडय़ापाडय़ातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अथक कार्य केले, असे पुरंदरे यांनी सांगितले.
राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाबासाहेब पुरंदरे यांना मानचिन्ह, सन्मानपत्र, व दहा लाख रुपयांच्या धनादेशासह ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले तेव्हा राजभवनाच्या सभागृहात तुतारीचे सूर निनादले, टाळ्यांचा कडकडाट झाला आणि गेल्या काही दिवसांपासून या पुरस्कारावरून उठलेल्या वादळाचा धुरळा पुरता पांगला.
छत्रपती शिवरायांचा इतिहास घराघरांतच नव्हे, तर गर्भवती मातेच्या पोटातील पिढीसही सहजपणे समजावा, या हेतूने सोप्या भाषेत लिहिण्याच्या व्रताचे मी पालन केले. त्यासाठी तुकाराम, ज्ञानेश्वरांच्या शब्दभांडारातील शब्द, व्याजासह परतफेड करण्याची हमी देऊन काना-मात्रांसह उसने घेतले आणि त्यातून शिवचरित्र लिहिले, असे त्यांनी सांगताच रसिकजनांचा ऊर आदराने भरून आला.
पुरस्कारावरून राज्यात सुरू असलेल्या गदारोळाचा उल्लेख न करता बाबासाहेबांनी सुमारे सहा दशकांपासून महाराष्ट्राला परिचित असलेल्या त्यांच्या भाषणशैलीने सर्वाना मुग्ध करून टाकले. विपरीत लेखन किंवा संदर्भ दिल्याच्या विरोधकांच्या प्रमुख आक्षेपाचा त्यांनी अनेक उदाहरणांसह समाचार घेतला. ज्येष्ठ इतिहासकार ग. ह. खेर यांच्यासारखे चिकित्सक व अचूकतेसाठी आग्रही गुरुवर्य व मार्गदर्शक आपल्याला लाभले होते, याचा त्यांनी उल्लेख केला.
एवढे प्रचंड कार्य कसे होणार याचे दडपण होते. पण ज्ञानेश्वरांनी प्रेरणा दिल्याने ते घडले. त्याचा मला अहंकार नाही. अहंकाराचा वाराही शिवू नये, अशीच माझी प्रार्थना आहे, असे बाबासाहेबांनी नमूद केले.
राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा माझा मोठा सन्मान आहे, पण या राज्याच्या उन्नतीसाठी हातभार लावणारा प्रत्येकजण ‘महाराष्ट्र भूषण’ आहे, आणि त्याचा हा सन्मान आहे, या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे, त्यासाठी आणखी काही वर्षे मला  पूर्ण क्षमतेने काम करण्याची संधी मिळाली, तर नक्कीच करीन, असा विश्वास बाबासाहेबांनी व्यक्त करताच सर्वानीच त्यांच्या उत्साहाला दाद दिली.

शिवशाहिराची दिलदारी
महाराष्ट्रभूषण पुरस्काराच्या १० लाख रुपयांत स्वत:च्या १५ लाख रुपयांची भर टाकून २५ लाख रुपयांची मदत कर्करुग्णांसाठी देत असल्याचे जाहीर केल्यावर शिवशाहिरांच्या दिलदारीला रसिकजनांनी टाळ्यांचा कडकडाट करीत दाद दिली.

महाराज असते, तर कडेलोट केला असता..
‘शिवाजी महाराजांचे नाव घेऊन जातीयवादी राजकारण करणाऱ्यांना ते कधी समजलेच नाहीत, असा टोला लगावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शिवाजी महाराज आज असते, तर त्यांनी जातीयवादी राजकारण करणाऱ्यांचा कडेलोटच केला असता,’ असे ठणकावले.