पक्ष्यांना अपायकारक खाऊ घालण्याच्या सवयीवर पक्षीप्रेमींकडून टीका

मुंबई : मलबार हिल येथे एका घराच्या खिडकीत बसून गाठय़ा (जाडे पिवळी शेव) खाणाऱ्या सहा हॉर्नबिल पक्ष्यांचे छायाचित्र समाजमाध्यमांवर शुक्रवारी प्रसारित झाल्यानंतर त्यावर पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून टीका होऊ लागली आहे. पक्ष्यांना आयते खाऊ घालून पुण्य कमावण्याच्या नागरिकांच्या सवयीबद्दलच्या चर्चेला यानिमित्ताने पुन्हा एकदा तोंड फुटले आहे.

मलबार हिल येथील एका नागरिकाने एक छायाचित्र शुक्रवारी फे सबुकवर प्रसिद्ध केले. यात एका घराच्या खिडकीत बसून सहा हॉर्नबिल पक्षी गाठय़ा खाताना दिसत आहेत. ‘आपले मूळ नैसर्गिक अन्न सोडून प्रक्रिया केलेले अन्न या पक्ष्यांनी खाल्ल्यास या पक्ष्यांवर काय परिणाम होऊ शकतो? हा शहरीकरणाचा दुष्परिणाम आहे’, अशा शब्दांत या नागरिकाने चिंता व्यक्त केली आहे. त्यानंतर इतर पक्षीप्रेमी नागरिकांनीही या कृतीवर टीका सुरू केली आहे.

गिरगाव चौपाटी, गेट-वे-ऑफ इंडिया येथेही अशा प्रकारे पक्ष्यांना गाठय़ा खायला घातल्या जात असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. घारापुरी लेण्यांकडे जाताना नौकांच्या दिशेने येणाऱ्या पक्ष्यांनाही नौकांमधील प्रवासी खाद्य देतात, याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली. ‘कार्टर रोड येथे दोन वृद्ध व्यक्ती पिशव्या भरून फरसाण घेऊन येतात व कावळ्यांना खाऊ घालतात. त्यांना विरोध करूनही ते ऐकत नाहीत. त्यामुळे कावळ्यांच्या आरोग्याला तर धोका पोहोचतोच शिवाय फरसाणचे तेल रस्त्यांवर पसरते’, असा अनुभव वांद्रे येथील रहिवासी गीता सेसू यांनी सांगितला.

असे का करू नये?

पुण्य कमावण्याच्या हेतूने काही नागरिक प्राणी-पक्ष्यांना खायला घालतात; परंतु, यामुळे प्राणी-पक्ष्यांमधील स्वत: अन्न शोधण्याचा नैसर्गिक गुणधर्म नष्ट होतो. ‘हॉर्नबिल झाडांची फळे, कीटक, छोटे पक्षी खातात. त्यातून न मिळणारे क्षार त्यांना मातीतून मिळतात. क्षारयुक्त अन्न आयते खायला मिळाल्यास पक्षी त्याकडे आकर्षित होतात; परंतु, गाठय़ांमध्ये असणाऱ्या पिठामुळे पक्ष्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. काही जण उरलेले अन्न पक्ष्यांना घालतात. या अन्नाला बुरशी, वगैरे लागलेली असल्यास पक्ष्यांची, प्राण्यांची पचनसंस्था बिघडते. पुढे त्यांना खाणाऱ्या इतर पक्षी, प्राण्यांवरही याचा परिणाम होतो. त्यामुळे पूर्ण अन्नसाखळीच धोक्यात येते’, अशी माहिती पर्यावरणवादी कार्यकर्ते रोहित जोशी यांनी दिली. ‘खरेतर कबूतर हा खडकांमध्ये राहणारा पक्षी असून कबुतरखान्यांमध्ये त्याला आयते अन्न आणि संरक्षण मिळत असल्याने तो एकऐवजी चार वेळा प्रजनन करतो. कबुतरांच्या विष्ठेपासून अनेक रोगही पसरतात’, असेही त्यांनी सांगितले.