मुंबईसह राज्यात स्वच्छतागृहांच्या अभावामुळे विशेषत: महिलांना बराच त्रास होत असल्याने आता राष्ट्रीय व राज्य महामार्गावर दर ५०किमी अंतरावर तसेच पथकर नाके, पेट्रोलपंप, धाबे, हॉटेल्स, शासकीय इमारती आदी ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्याचा निर्णय मंगळवारी शासनाच्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. स्वच्छतागृहांच्या उपलब्धतेबाबत तातडीने पावले टाकण्यासाठी र्सवकष धोरण तयार करून मंत्रिमंडळापुढे ठेवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वच्छता विभागाला दिल्या.
महिलांसाठी स्वच्छतागृहांच्या मुद्दय़ावर विविध विभागांचे सचिव, महिला व बालकल्याण मंत्री वर्षां गायकवाड, अतिरिक्त मुख्य सचिव जे.एस.सहारिया, पश्चिम व मध्य रेल्वेचे अधिकारी आदींच्या उपस्थितीत मंगळवारी बैठक झाली. मुंबईसारख्या महानगरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर महिला प्रवास करीत असतानाही रेल्वेस्थानकांवर पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत. दादरसारख्या स्थानकातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या स्वच्छतागृहाची अवस्थाही खराब आहे, असे मुद्दे बैठकीत उपस्थित करण्यात आले. राष्ट्रीय व राज्य महामार्गावर प्रवास करतानाही अगदी हॉटेलांमध्येही महिलांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था नसते. पेट्रोलपंप, टोलनाके, हॉटेल्स यांना मंजुरी देताना स्वच्छतागृहांची अट घातलेली असते, पण त्याचे पालन होत नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्याही निदर्शनास हे मुद्दे आणून देऊन पेट्रोलपंपांना महिला स्वच्छतागृहे बांधण्याची सक्ती केली जावी, अशी विनंती केली जाणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री वर्षां गायकवाड यांनी दिली.

स्वच्छतागृहांसाठी उपाययोजना
*     महिला स्वच्छतागृहांसाठी विकास आराखडय़ात जागानिश्चिती
*     बस,रेल्वेस्थानके, तीर्थश्रेत्रे, पर्यटनस्थळे, शाळा, महाविद्यालये स्वच्छतागृहे बांधणार
*     पाणी नसल्यास संबंधितांवर कारवाई
*     स्वच्छतागृहांचे व्यवस्थापन महिला गटांकडे
*     महानगरांमध्ये प्रत्येक रेल्वेस्थानकाबाहेर, पुलाखालील मोकळ्या जागेत, बसस्थानके, शासकीय इमारती येथे स्वच्छतागृहे
*     स्वच्छतागृहात रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक

एका पाहणीनुसार मुंबईतील स्वच्छतागृहांची दारूण स्थिती
*    चर्चगेट ते डहाणू, सीएसटी ते कर्जत-कसारा आणि पनवेलपर्यंत उपनगरी सेवेचे जाळे असताना लाखो प्रवाशांसाठी केवळ ३५५ शौचालये आणि ६७३ मुताऱ्या़
*    चीन, अमेरिका, ब्रिटनमधील रेल्वेप्रवाशांच्या संख्येशी तुलना केल्यास १२ हजार स्वच्छतागृहांची कमतरता़
*    महिला प्रवाशांची संख्या मोठी असताना उपनगरी स्थानकांवर केवळ १७ टक्के स्वच्छतागृहे महिलांसाठी आणि त्यातील ९० टक्क्य़ांहून अधिक बंद किंवा दरुगधीयुक्त.