दहशतवादाचा धोका मुंबईलाच नव्हे तर साऱ्या देशाला आहे. त्या विरोधात लढण्यासाठी सर्व गुप्तचर यंत्रणांमध्ये समन्वय आणण्याचा मनोदय राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे नवनियुक्त प्रमुख हिमांशू रॉय यांनी व्यक्त केला. सोमवारी त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
मुंबईचे सहपोलीस आयुक्त (गुन्हे) पदावर ३ वर्षे ११ महिने काम केल्यानंतर रॉय यांना बढती देऊन राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. शहरातील गुन्हेगारी आणि दहशतवाद या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. दहशतवादाविरोधात अनेक यंत्रणा स्वतंत्रपणे लढत असतात. त्यांच्यात समन्वय आणण्यासाठी आपण प्रयत्न करू,  असे ते म्हणाले. गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त असताना आपण अनेक गुन्ह्यांची उकल केली. परंतु पत्रकार जे. डे हत्या प्रकरण सर्वात कठीण आणि आव्हानात्मक होते, अशी कबुली त्यांनी दिली. मुंबई पोलीस आणि दहशतवादविरोधी पथक यांच्यात स्पर्धा नव्हती आणि यापुढेही नसेल, असेही ते म्हणाले. मुंबईत अद्याप मानवी बॉम्बचा वापर झालेला नसला तरी त्याचा धोका कायम असल्याचे ते म्हणाले. आपली कारकीर्द मुंबईत गेल्याने स्वत:चे नेटवर्क आहे आणि त्याचा उपयोग होईल, असेही ते म्हणाले.