मध्य रेल्वेने पत्रे पाठवूनही प्रशासनाचे डोळ्यावर कातडे

महाडजवळील पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती बेसुमार रेतीउपशामुळे मध्य रेल्वेवर कोणत्याही क्षणी होऊ शकते. मध्य रेल्वेवरील ब्रिटिशकालीन पुलांपकी मुंब्रा खाडीवरील पुलाजवळ अवैध बेसुमार रेतीउपसा चालू आहे. त्यामुळे पुलाखालील जमीन भुसभुशीत झाली आहे. हा पूल कोसळल्यास मोठय़ा जीवितहानीबरोबरच मुंबईचा दक्षिणेशी असलेला संपर्क तुटू शकतो. याबाबत रेल्वे प्रशासनाने स्थानिक महापालिका तसेच जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार पत्रे पाठवूनही रेती उपसा अर्निबध सुरूच आहे.

मुंब्रा खाडीवरील हा पूल १९१६ मध्ये बांधला होता. पूर्वी खांबांवर बेतलेला हा पूल आता दोन्ही बाजूंनी गर्डरवर तोलला आहे. पूर्वी या पुलाच्या आसपास खारफुटी जंगले होती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये दिवा, मुंब्रा आणि कोपर या स्थानकांदरम्यान ठाण्यातील वाळू माफियांनी प्रचंड वाळू उपसा केला आहे. या माफियांना राजकीय साथ मिळत असल्याची चर्चाही आहे. मध्य रेल्वेने या उपश्याबद्दल दोन वर्षांपूर्वीच ठाणे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवले होते. त्यानंतर गेल्या वर्षभरात मुंब्रा स्थानकाच्या पूर्वेकडेही तिवरांची कत्तल करून वाळू उपश्याचे प्रमाण वाढले आहे.

या उपश्यामुळे भरतीच्या वेळी खूप पाणी पुलापर्यंत येते आणि ओहोटी लागताच पुलाखालील वाळूही वाहून जाते. परिणामी पुलाचा पाया कमकुवत होतो. दिवा-कोपर स्थानकांदरम्यान हाच प्रकार चालू असल्याने तेथे रेल्वेने रूळांपासून १०-१५ मीटर अंतरावर संरक्षक िभत बांधली आहे. तसेच येथे वेळोवेळी भरावही टाकला जातो. हे उपाय तात्पुरते असून जिल्हा व पालिका प्रशासनाने वाळू उपसा रोखण्याची गरज आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने या दोन्ही यंत्रणांना वेळोवेळी पत्रे पाठवूनही त्यांची काहीच दखल घेतली नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.