मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या जकातीमध्ये गेल्या वर्षभरात सुमारे ७.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, मुंबईत आलेले कच्चे तेल वगळता अन्य मालावरील जकातीत ही वाढ झाली आहे. दरम्यान, कच्च्या तेलावरील जकातीचा दर १.५ टक्क्यांनी वाढविण्यात आल्याने त्याद्वारे मिळणाऱ्या महसुलातही वाढ होईल, असा आशावाद पालिका आयुक्तांनी व्यक्त केली आहे.
जकात न भरताच पळून जाणाऱ्या वाहनांची धरपकड करण्यासाठी पालिका प्रशासनाने जकात नाक्यांवर विशेष पथके आणि सुरक्षारक्षकांची फौज तैनात केल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये जकातीच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. १ एप्रिल २०१४ ते १४ मार्च २०१५ या कालावधीत पालिकेला जकातीद्वारे ४,११९.२९ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. आता १ एप्रिल २०१५ ते १४ मार्च २०१६ या कालावधीत जकातीद्वारे ४,४१८.०७ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. मात्र त्यामध्ये कच्च्या तेलावर जकातीचा समावेश नाही. असे असतानाही गतवर्षीच्या तुलनेत २०१५-१६ मध्ये जकातीमध्ये ७.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जागातिक आर्थिक मंदी आणि जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतीत मोठय़ा प्रमाणावर झालेली घसरण याचा पालिकेच्या महसुलावर परिणाम झाला आहे. परिणामी मुंबईत आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर वसूल केल्या जाणाऱ्या जकातीचे प्रमाण कमी होऊ लागले असून त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नातही घट होऊ लागली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २०१५-२५ मध्ये कच्च्या तेलावरील जकातीद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात ६११.६७ कोटी रुपये घट झाली आहे. महसुलात होत असलेली घट लक्षात घेऊन पालिकेने कच्च्या तेलावरील जकात ३ टक्क्यांवरून ४.५ टक्के केली असून त्यास स्थायी समितीनेही मंजुरी दिली आहे. परिणामी, भविष्यात कच्च्या तेलावरील जकातीच्या उत्पन्नात होणारी घट भरून निघेल, असा विश्वास पालिका आयुक्त अजय मेहता यांनी व्यक्त केला आहे.