अचानक समोर आलेल्या ऑनलाइन वर्गाशी जुळवून घेताना शिक्षकांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याची गरज प्रकर्षांने समोर आल्यानंतर आता यासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करण्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विचाराधीन असून ‘राष्ट्रीय शिक्षण तंत्रज्ञान व्यासपीठ’चा मसुदा जाहीर केला आहे.

शिक्षकांना तंत्रकुशल करण्याची गरज लक्षात घेऊन आयोगाने स्वतंत्र संस्था सुरू करण्याचा मानस जाहीर केला आहे. यासंदर्भातील मसुदा जाहीर करण्यात आला असून इच्छुकांना ६ फेब्रुवारीपर्यंत सूचना आणि आक्षेप नोंदवता येतील. शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढणे अपरिहार्य आहे. याबाबतचे बदल सक्षमपणे अंतर्भूत करता यावेत, येत्या काळात शिक्षण तंत्रज्ञानाचा वापर योग्य प्रकारे व्हावा आणि सर्वाना योग्य प्रकारे त्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष व्यासपीठ स्थापन करण्यात येणार आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून संकल्पना सुचविणे, सुविधांचे व्यवस्थापन, नियोजन, मूल्यांकन, अध्ययन सुविधा उपलब्ध करून देण्यात यातील. ही सुविधा महाविद्यालयांबरोबरच शाळांसाठीही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे या मसुद्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात निवृत्त प्राध्यापक, विषय तज्ज्ञ आदींचे मार्गदर्शन घेण्याबाबत यात सूचना करण्यात आल्या आहेत. यामध्ये देशातील विविध भाषांमध्ये शिकविणाऱ्या प्राध्यापकांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. देशात शिक्षण प्रशिक्षणासाठीही तज्ज्ञांची एक फळी तयार करण्याची सूचना या मसुद्यात करण्यात आली आहे. यात विविध क्षेत्रांतील उद्योजक, उच्च पदस्थांचाही समावेश करण्याच्या सूचना यात करण्यात आल्या आहेत.