भिकारी, फेरीवाल्यांवर लक्ष ठेवण्याच्या पोलिसांकडून रेल्वे प्रशासनाला सूचना

मुंबई महाराष्ट्रासह देशभरात रेल्वे रूळांमध्ये घातपाताचे प्रकार लक्षात घेता राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस यंत्रणांना सतर्क राहाण्याचे सूचना केल्या आहेत. महाराष्ट्र पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रेल्वे हददीत भिकारी, फेरीवाले आणि बेवारस अल्पवयीन मुलांकरवी घातपात घडवला जाऊ शकतो. त्यामुळे या सर्वाना रेल्वे हददीतून दूर ठेवण्यासाठी सातत्याने मोहिमा हाती घ्या, दोन स्थानकांमधील रेल्वे रूळ सुरक्षित आहेत ना याची तपासणी गांभीर्याने घ्या व त्यासाठीचे मनुष्यबळ वाढवा, तांत्रिक किंवा डागडुजीच्या कामांसाठी अनेकदा रेल्वे रूळांभोवतीच यंत्रसामुग्री साठवली जाते. तसे न करता ही यंत्रसामुग्री किंवा टाकाऊ वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवा, अशाही सूचना पोलिसांनी रेल्वे प्रशासनाला केल्या आहेत. त्यानुसार सोमवारी या रेल्वे प्रशासनाने सर्व संबंधीत अधिकाऱ्यांना तशा सूचना जारी केल्या.

रेल्वेच्या मालमत्तेच्या सुरक्षेची मुख्य जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाकडे आहे. तर या हददीत घडलेल्या गुन्हयांची उकल करण्याचे जबाबदारी राज्य रेल्वे पोलिसांकडे आहे. या दोन्ही यंत्रणांनाही सतर्क करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांच्या सूचना प्राप्त होताच रेल्वे प्रशासनानेही आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना सतर्क करण्यासाठी उपाययोजना आखण्यास सुरूवात केल्याचे समजते. रुळांवरील घातपाताच्या शक्यतेने खबरदारी घेतली जात आहे. मंगळवारपासून तीन दिवस भिकारी व फेरीवाल्यांविरोधात मोठी मोहीम उघडण्यात येईल. महत्वाची बाब म्हणजे रुळांच्या देखभाल व सुरक्षेसाठी संबंधित विभागांना आम्ही पत्र दिले आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे सुरक्षा दल-वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त अनुप शुक्ला यांनी दिली.

याआधी जानेवारीत दिवा स्थानक आणि दिवा-पनवेल कोकण रेल्वे मार्गावर रूळांवर लांखंडी वस्तू, स्फोटक ठेवून घातपाताचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी राज्य दहशतवादविरोधी पथकाकडूनही चौकशी व तपास सुरू करण्यात आला. फेब्रुवारीत पनवेल-जेएनपीटी मार्गावरील जसई रेल्वे स्थानकाजवळील रुळावर लोखंडी खांब आढळला. पटणा-इंदोर एक्सप्रेसचे कानपूर येथे डबे रुळावरुन घसरल्याने अनेक प्रवासी जखमी झाले. हा अपघात नसून घातपात असावा असा संशय तपास यंत्रणांना आहे. उत्तरप्रदेश निवडणुकांपुर्वी भोपाळ-उज्जन पॅसेंजरमध्ये स्फोट घडला होता. या पाश्र्वभुमीवर राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी उच्चस्तरीय बठक बोलावली होती. सुरक्षेच्या दृष्टीने अनधिकृत प्रवेशद्वार, कंत्राटी कामगारांची पाश्र्वभुमी तपासणे, रेल्वे पूल, बोगदे यांची पाहणी करतानाच रुळांवर गस्त वाढवणे, अशा सूचनाही केल्या होत्या.