आशिया खंडातील देशांमध्ये मंगळावर यान पाठवण्यासाठी चढाओढ सुरू आहे. जर भारताचं मंगळयान मंगळावर पोहोचण्यात यशस्वी झालं, तर अंतराळक्षेत्रात भारताने चीनला आणि जपानला मात देण्यासारखे आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने मंगळावर उपग्रह पाठवण्याची तयारी केली आहे. येत्या मंगळवारी म्हणजेच ५ नोव्हेंबर रोजी भारताचे पहिलेवहिले मंगळयान मंगळाच्या दिशेने कूच करेल. हे यान खरे तर २८ ऑक्टोबर रोजी कूच करणार होते, मात्र प्रशांत महासागरातील खराब वातावरणामुळे हे अभियान एका आठवडय़ासाठी पुढं ढकलण्यात आलं.
हे यान यशस्वीपणे अंतराळात पोहोचवलं, तर भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो ही अमेरिका, युरोप आणि रशियानंतर चौथ्या नंबरची मंगळावर यशस्वीपणे यान पाठवणारी संस्था ठरणार आहे. मंगळयान बेंगलुरूच्या एका अत्याधुनिक प्रयोगशाळेत बनवण्यात आलं आहे. यापूर्वी २०११मध्ये चीनने ियगहू-१ नावाचं अंतराळयान मंगळवार पाठवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे चीनला अपयश आलं.
यानंतर भारतीय अंतराळ संस्थेने मंगळयान नावाच्या आपल्या मंगळ अभियानाला गती दिली आहे. हे यान केवळ १५ महिन्यांत तयार करण्यात आलं आहे.
चीन अंतराळ क्षेत्रात शक्तीशाली देश आहे. चीनची सीएनएसए ही अंतराळ संस्था आहे. या संस्थकडे अंतराळ यात्रेचा कार्यक्रम ठरला आहे. सीएनएसए या वर्षी डिसेंबरमध्ये चंद्रावर चेंग-३ हे अंतराळयान पाठवणार आहे.
मोहिमेची मुख्य उद्दिष्टे
*चांद्रमोहीम फत्ते करणारा भारत आंतरग्रहीय मोहिमांसाठी किती सक्षम आहे हे या मोहिमेद्वारे तपासले जाईल.
*पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचा वापर करून एखादे यान मंगळाच्या कक्षेत पोहचविणे हे देखील मुख्य उद्दिष्ट या मोहिमेमागे ठरविण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर पुढे इतर ग्रहांच्या अभ्यास मोहिमांसाठी करता येऊ शकतो.
*डीप स्पेस नेटवर्कच्या सहाय्याने अवकाशातील यानाला नियंत्रित करणे, तसेच डीप स्पेस नेटवर्कचा वापर करणे.
*तब्बल दहा महिन्यांच्या प्रवासानंतर योग्य वेळी तात्पुरती बंद करण्यात आलेली यंत्रे पृथ्वीवरून पुन्हा योग्य वेळी चालू करणे. हे तंत्रज्ञानदेखील पुढील आंतरग्रहीय मोहिमांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे समजले जाते.
*मंगळाच्या वातावरणाचा योग्य अभ्यास करणे आणि  इतर देशांच्या मोहिमांतून सुटलेल्या काही मुद्दय़ांचा अभ्यास करणे.
*मंगळावरील पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांच्या रहासाची कारणे शोधणे.
मोहिमेतील अडचणी
भारताने यापूर्वी कोणतीही आंतरग्रहीय मोहीम राबवलेली नसल्यामुळे त्यासाठी आवश्यक वाटणारे तंत्रज्ञान भारतात तेवढय़ा प्रगल्भ प्रमाणात उपलब्ध नाही आणि ही भारतीयांसाठी मोठी अडचण आहे. यापूर्वी भारताला चांद्रयान मोहिमेचा अनुभव असला, तरी चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर ३.८० लक्ष किलोमीटर आहे, परंतु पृथ्वी ते मंगळादरम्यानचे अंतर ५६० लक्ष किलोमीटर इतके प्रचंड आहे. त्यामुळे मंगळापर्यंत पोहोचण्यासाठी यानाला लागणारा कालावधी हा वर्षभराइतका मोठा असेल. या काळात नको असणारी उपकरणे व तंत्रज्ञान तात्पुरते बंद करून ते योग्य वेळी चालू करण्याचे आव्हान भारतीय शास्त्रज्ञांसमोर असेल. या मोहिमेसाठी आवश्यक असणारे सर्व तंत्रज्ञान भारतात विकसित करणे, त्या दृष्टीने साऱ्यांचे व्यवस्थापन करणे, हे आव्हानही विशेष असेच म्हणावयास हवे.
यानाविषयी थोडे
ल्ल  हे यान आंध्र प्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून ‘सतीश धवन अंतराळ केंद्रा’वरून मंगळाच्या दिशेने प्रक्षेपण केले जाणार आहे. यामध्ये ‘पीएसएलव्ही सी-२५’ हे लाँचिंग व्हेईकल वापरण्यात येणार आहे. साधारणत: २५ दिवस हे यान पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावेल आणि ३० नोव्हेंबरला पृथ्वीच्या कक्षेतून पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचा वापर करून मंगळाकडे झेपावेल. इस्रोच्या अंदाजानुसार  २१ सप्टेंबर २०१४पर्यंत हे यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावेल, अशी आशा शास्त्रज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
ल्ल  या वेळी उपलब्ध होणारी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क व संपर्कक्षेत्राच्या बाहेर असताना इस्रो नासाच्या डीप स्पेस नेटवर्कची मदत घेणार आहे. या स्पेस नेटवर्कच्या मदतीने आंतरग्रहीय मोहीम राबवणे हेसुद्धा मोठे आव्हानच ठरणार आहे.
ल्ल  मंगळाभोवतीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत भ्रमण करताना हे यान मंगळाच्या जमिनीपासून साधारणत: ३७१ किमी अंतरावरून भ्रमण करू शकेल.