News Flash

‘नाइट क्लब’मध्ये बेपर्वाई सुरूच!

आयुक्तांच्या इशाऱ्यानंतरही करोना नियम धाब्यावर

आयुक्तांच्या इशाऱ्यानंतरही करोना नियम धाब्यावर; चार क्लबमध्ये ५६० जणांवर कारवाई

मुंबई : बेसुमार गर्दी, मुखपट्टी न वापरणे, पहाटेपर्यंत सुरू असलेला धिंगाणा यांमुळे करोना र्निबधांचे उल्लंघन करणाऱ्या नाइट क्लबवर महापालिका आयुक्तांनी कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, त्यानंतरही ‘नाइट क्लब’मधील बेपर्वाई सुरूच आहे. ‘मुंबई अड्डा पब’, ‘प्रीतम हॉटेल’, ‘रुड लाउंज’ आणि ‘भगवती हॉटेल’ या चार ठिकाणी मुखपट्टय़ा न लावता मोठय़ा संख्येने लोक जमल्याचे पालिकेने घातलेल्या छाप्यात आढळून आले. या प्रकरणी ‘मुंबई अड्डा क्लब’विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर साडेपाचशेहून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली.

करोनामुळे कोणत्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये याकरिता केवळ ५० लोकांनाच परवानगी दिली जाते. तसेच सामाजिक अंतराचे नियम पाळण्याचे व सार्वजनिक ठिकाणी वावरताना मुखपट्टय़ा लावण्याचेही बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र तरीही मुंबईतील नाइट क्लब आणि हॉटेलांमध्ये हे नियम पायदळी तुडवले जात आहेत. त्यामुळे गेल्या आठवडय़ात पालिकेने मुंबईतील क्लबवर छापे घातले असता तेथे मोठय़ा संख्येने लोक पहाटेपर्यंत जमले असल्याचे आढळून आले.  त्यानंतर पालिका आयुक्तांनी या क्लबना नियम पाळण्याची ताकीद दिली. नियम पाळले नाही तर रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा इशारा देत मुंबईतील नाइट क्लबवर तपासणी करण्यासाठी पथके  नेमली. मात्र तरीही या क्लबमध्ये बेपर्वाई सुरूच आहे.

सांताक्रूझ लिंकिंग रोड येथील रामी एमराल्डमधील ‘मुंबई अड्डा’ या पब आणि बारवर पालिकेच्या पथकाने रविवारी मध्यरात्री छापा घातला असता हा प्रकार उघड झाला. या पबबरोबरच दादर पूर्वेकडील प्रीतम हॉटेलमध्ये मध्यरात्री घातलेल्या छाप्यात १२० जणांवर कारवाई करण्यात आली. गोरेगावमधील रुड लाऊंजमध्ये रात्री बाराच्या सुमारास ७५ जणांवर तर कांदिवलीतील भगवती हॉटेलमधील ९० जणांवर कारवाई करण्यात आली. या चारही क्लबच्या व्यवस्थापनांना नोटीस बजावण्यात आली आहे.

करोना अद्याप संपलेला नाही हे लोकांनी ध्यानात ठेवावे. रात्रीची संचारबंदी लावण्याचा आमचा विचार नाही. पण लोकांनी नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या तोंडावर काळजी घेतली नाही तर कडक पावले उचलावी लागतील.

– इक्बाल सिंह चहल,  महापालिका आयुक्त 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 2:02 am

Web Title: indifference continues in nightclubs of mumbai zws 70
Next Stories
1 उन्नत मार्गाच्या खर्चात वाढ
2 बनावट कागदपत्रांनिशी पासपोर्ट विक्री
3 ‘कोरा केंद्रा’कडून १९ एकर शासकीय भूखंडाचा व्यापारी वापर?
Just Now!
X