तोकडे कपडे परिधान केल्याने एका महिला प्रवाशाला ‘इंडिगो’ने आपल्या विमानात चढण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित महिला मुंबईहून दिल्लीला जाणाऱया ‘इंडिगो’च्या विमानाने प्रवास करणार होती. मात्र, तोकडे कपडे घातल्याचे कारण देत तिला ‘इंडिगो’च्या कर्मचाऱयांनी अडवले व प्रवास करण्यास नकार दिला.
विमानातील सहप्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार त्या महिलेने परिधान केलेल्या कपड्यांत कोणत्याही प्रकारची अश्लिलता नव्हती. तिने गुडघ्यापर्यंत कपडे घातले होते तरीही तिला अडवण्यात आले. अखेरीस कपडे बदलून आल्यानंतर ‘त्या’ महिलेला दुसऱया एका विमानाने दिल्लीला पाठविण्यात आले.

दरम्यान, या संपूर्ण प्रकाराची ‘इंडिगो’नेही कबुली दिली आहे. मात्र, त्यावर दिलेल्या स्पष्टीकरणात ‘इंडिगो’ कंपनीच्या कर्मचाऱयांना लागू असलेल्या निमयांचे कारण कंपनीकडून देण्यात आले आहे. संबंधित महिला ही ‘इंडिगो’ कंपनीची माजी कर्मचारी असून तिची बहिण सध्या या कंपनीत कार्यरत आहे. ‘इंडिगो’ कंपनीच्या नियमानुसार कंपनीतील कर्मचारी आणि त्याचे कुटुंबिय कंपनीच्या कर्मचाऱयाला देण्यात आलेल्या सवलतीअंतर्गत विमान प्रवास करत असतील तर, विमान प्रवासात कंपनीने ठरविलेल्या ‘ड्रेस कोड’चे पालन करणे बंधनकारक आहे. याच धोरणानुसार संबंधित महिलेला थांबविण्यात आल्याचे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले आहे.