खार पोलिसांनी पेणच्या जंगलातून जप्त केलेली मृतदेहाची कवटी आणि दोन हाडे शीनाचीच असल्याचा खुलासा डीएनए चाचणीतून झाला आहे. तसेच शीनाचे डीएनए इंद्राणी आणि सिद्धार्थ दास यांच्याशी जुळले आहेत. इंद्राणीने शीनाच्या जन्मदाखल्यावर आईवडील म्हणून आपले वडील वी. के. बोरा आणि आपल्या आईचे नाव लावले होते. त्यामुळे शीना नेमकी मुलगी कुणाची असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, डीएनए चाचणीच्या अहवालाने शीनाही सिद्धार्थ दास यांची मुलगी होती यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
दरम्यान, इंद्राणी मुखर्जी आणि श्याम राय यांना सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर, संजीव खन्ना याच्या पोलीस कोठडीत एका दिवसाची वाढ करण्यात आली. कोलकाता पोलिसांकडून चौकशी केल्यानंतर संजीव खन्नाला तेथील न्यायालयात हजर करण्यात येईल. इंद्राणी मुखर्जी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि त्यांचा कारचालक श्याम राय यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपली. त्यामुळे पुढील सुनावणीसाठी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस चौकशी पूर्ण झाल्यामुळे आता इंद्राणी आणि श्याम राय यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची गरज नसल्याची नोंद यावेळी न्यायालयाने केली व दोघांनाही २१ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले. तर, संजीव खन्नाला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.