साडेसात हजार विद्यार्थी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेले

प्रवेशाच्या उतरंडीत एकेकाळी शेवटच्या स्थानावर असणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाकडे गुणवंत विद्यार्थ्यांची पावले वळली आहेत. यंदा दहावीला ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या साडेसात हजार विद्यार्थ्यांनी ‘आयटीआय’मध्ये प्रवेश घेतला आहेत. प्रवेश क्षमतेत मोठय़ा प्रमाणावर वाढ होऊनही रिक्त राहिलेल्या जागांचे प्रमाणही अवघे १६ टक्के आहे.

दहावीला ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक गुण म्हणजे विज्ञान शाखेला प्रवेश, त्यानंतर वाणिज्य, नंतर कला आणि प्राधान्यक्रमात सगळ्यात शेवटच्या स्थानावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) अशी गेली अनेक वर्षे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांची मानसिकता होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून ‘आयटीआय’मधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. उपलब्ध प्रवेश क्षमतेच्या चौपट अर्ज यंदा ‘आयटीआय’ प्रवेशासाठी आले होते. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याच नाही तर गुणांच्या पातळीवरही ‘आयटीआय’मधील प्रवेशाची स्पर्धा यंदा मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचे दिसत आहे.

दहावीच्या निकालादरम्यान गुणवत्तेचा फुगवटा यंदा मोठय़ा प्रमाणावर वाढला. पर्यायी सगळ्याच शाखांमधील प्रवेशासाठी चुरस निर्माण झाली. मात्र यामध्ये अगदी ८० टक्क्यांपेक्षाही अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनीही ‘आयटीआय’मधील प्रवेशाला पसंती दिली आहे. यंदा राज्यभरात ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेल्या ७ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी ‘आयटीआय’ला प्रवेश घेतला आहे. त्यापैकी २६५ विद्यार्थ्यांना तर ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. यंदा ७० ते ८० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २६ हजार २३२ आहे.

यंदा राज्यातील ‘आयटीआय’च्या जागांमध्ये वाढ करण्यात आली होती. मात्र तरीही रिक्त राहिलेल्या जागांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. अवघ्या १६ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. शासकीय आणि खासगी ‘आयटीआय’ मिळून राज्यात १ लाख ४४ हजार ७७४ जागा उपलब्ध होत्या, त्यापैकी १ लाख २१ हजार ४८७ जागांवर प्रवेश झाले आहेत. यंदा ‘आयटीआय’ प्रवेशासाठी तब्बल चार लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता.

बारावीची परीक्षा देण्याचीही संधी

‘आयटीआय’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गेल्या काही वर्षांपासून नोकरीच्या चांगल्या संधी मिळत आहेत. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घ्यायचे आहे त्यांच्यासाठीही आता बारावीचे प्रमाणपत्र मिळवण्याची संधी खुली झाली आहे. ‘आयटीआय’चे विषय आणि भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना बारावीचे प्रमाणपत्र मिळू शकणार असल्याने ‘आयटीआय’ प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत आहे.