संस्थेतील प्राध्यापकाची संचालकांपासून राष्ट्रपतींपर्यंत तक्रार

तंत्रशिक्षणातील अत्यंत दर्जेदार अशी सर्वोच्च संस्था म्हणून ओळख असलेल्या आयआयटी मुंबईतील परीक्षेत अनेक गैरप्रकार होत असल्याची तक्रार याच संस्थेतील एका वरिष्ठ प्राध्यापकाने केली आहे. अशा प्रकारांमुळे संस्थेची प्रतिमा मलीन होऊ शकेल आणि आम्हा प्राध्यापकांना शरमेने मान खाली घालावी लागेल असे या प्राध्यापकाने तक्रारपत्रात नमूद केले आहे.

आयआयटी मुंबईच्या जनमानसातील प्रतिमेशी विपरीत अशा गोष्टींबाबत वाच्यता करणारे हे पत्र संबंधित प्राध्यापकाने संस्थेचे संचालक, नियामक मंडळ, राष्ट्रपती, मनुष्यबळ विकास मंत्रालय तसेच संस्थेतील सर्वच प्राध्यापकांना पाठविले आहे. हे पत्र लिहिताना मला अत्यंत दु:ख होत आहे. मात्र मला मिळालेल्या माहितीनुसार परीक्षेच्या काळात संस्थेतील स्वच्छतागृहांमध्ये पुस्तके अथवा पुस्तकांची पाने लपविलेली असतात. विद्यार्थी परीक्षेच्या दरम्यान स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी म्हणून जातात व तेथे दडवलेल्या पुस्तकातील संदर्भ पाहतात, असे या प्राध्यापकाने पत्रात नमूद केले आहे.

अनेकदा परीक्षेच्या वर्गात चिठ्ठय़ा पाठविण्याचे प्रकारही होतात. तसेच अनेक विद्यार्थी परीक्षागृहांत मोबाइल नेतात व त्यात साठवून ठेवलेल्या फाइल्समधूनही उत्तरे शोधतात, असा दावा या प्राध्यापकाने पत्रात केला आहे. अनेकदा परीक्षावर्गाच्या बाहेरूनही इतर विद्यार्थी आपल्या मित्रांना उत्तरे लिहिण्यासाठी मदत करत असल्याचे प्राध्यापकाने पत्रात म्हटले आहे.

संस्थेत सुरू असलेल्या या गैरप्रकाराबाबत आपण प्राध्यापक मंडळी फारसे काही करू शकत नाही. यावरून असे दिसते की आपण कुठेतरी संस्थेतील शैक्षणिक दर्जाबाबत तडजोड करत आहोत. हे सर्व रोखण्यासाठी आणि संस्थेच्या विश्वासार्हतेला तडा जाऊ नये यासाठी याबाबत तातडीने उपाया योजना करणे आवश्यक आहे, अशी पुस्ती त्यांनी पत्रात जोडली आहे. उत्तर प्रदेश सरकारने मवाली व छेडछाड करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी ज्या प्रकारे ‘अँटी रोमिओ’ दल स्थापन केले आहे तसेच संस्थेत ‘अँटी चीट’दल स्थापन करावे अशी सूचनाही त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

संस्थेतील सद्यस्थिती संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवू शकते व आपल्याला शरमेने मान खाली घालण्यास भाग पाडू शकते. गेल्या काही वर्षांत ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ लागली आहे. यामुळे याकडे संस्था चालविणाऱ्या यंत्रणांचे लक्ष वेधणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. त्याचवेळी, माझ्या या पत्रप्रपंचाचा सकारात्मक फायदा होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. संस्थेतील गैरप्रकारांबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा होईल आणि कदाचित प्राध्यापकांच्या प्रामाणिकतेबाबतही प्रश्न विचारला जाऊ शकेल अशी शंकाही त्याने व्यक्त केली आहे.

या पत्रासंदर्भात संस्थेचे संचालक डॉ. देवांग खक्कर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे पत्र आल्याचे मान्य केले. मात्र याबाबत अधिक काही बोलण्यास करण्यास नकार दिला. दरम्यान, या पत्राबाबत संस्थेतील प्राध्यापकवर्ग सकारात्मक असून यानिमित्ताने संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकविण्यात आणि असे गैरप्रकार टाळण्यास सर्वानी एकत्रित येऊन या समस्येचे मूळ कारण शोधण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.