२०११-१२ मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेच्या अर्जातील धर्माच्या रकान्यात ‘मुस्लीम’ असा करण्यात आलेला शब्दप्रयोग बदलून तो ‘इस्लाम’ असा करण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे शुक्रवारी उच्च न्यायालयात करण्यात आली.
याचिकादारांच्या दाव्यानुसार, यापूर्वी जनगणनेच्या अर्जात ‘धर्म’ असा रकानाच अस्तित्वात नव्हता, परंतु २०१२-१३ मध्ये करण्यात आलेल्या जनगणना अर्जात पहिल्यांदाच या रकान्याचा समावेश करण्यात आला आणि पर्यायांमध्ये ‘मुस्लीम’ असा शब्दप्रयोग करण्यात आला. शिवाय अद्याप जनगणना अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. वास्तवात ‘इस्लाम’ हा धर्म आहे.
त्यामुळे या अर्जात सुधारणा करून मुस्लीमऐवजी इस्लाम असा शब्दप्रयोग करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. शिवाय जनगणनेचे अर्ज मागे घेऊन त्यात आवश्यक ती सुधारणा करावी आणि नंतर जनगणनेचा अहवाल जाहीर करावा, असे आदेश केंद्र सरकारला देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.
एजाज पठाण यांनी या मागणीसाठी याचिका केली असून न्यायमूर्ती एस. जे. वझिफदार आणि न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.