मुंबई : मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातून बचावलेला इस्रायली चिमुकला मोशे हॉल्जबर्ग याची इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भेट घेतली. दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणलेल्या नरिमन हाऊस येथे ही भेट झाली. यावेळी नेतान्याहू यांनी मोशेची गळाभेटही घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून मोशे भारतात आला आहे.


मोशेने मंगळवारी देखील नरीमन हाऊसला भेट दिली होती. यावेळी मोशेसोबत त्याचे आजी-आजोबा उपस्थित होते. २००८मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या बेधुंद गोळीबारात मोशेचे आई-वडिल याच जागेवर ठार झाले होते. त्यावेळी मोशे केवळ २ वर्षांचा होता. या हल्ल्यातून तो बचावला होता.


नरीमन हाऊसमध्ये मोशेच्या स्वागतासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, मोशेच्या आजोबांनी भारतात येऊन आपल्याला आनंद वाटत असल्याचे म्हटले आहे. तसेच आता आम्ही भारतात जास्त सुरक्षित आहोत अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.