“जय श्रीराम ऐकायला व म्हणायला या देशात कुणलाही त्रास झालाच नाही पाहिजे. जय श्रीराम म्हटल्याने कुणाचीही धर्मनिरपेक्षता धोक्यात येणार नाही. श्रीराम या देशाची अस्मिता आहे, आधार आहेत. असं आम्ही मानतो. जय श्रीराम हा काही राजकीय शब्द नाही. हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे. मला संपूर्ण विश्वास आहे, ममता बॅनर्जी देखील प्रभू श्रीरामावर श्रद्धा ठेवतात.” असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखवलं आहे.

ममता बॅनर्जी यांना जय श्रीराम ऐकण्यास व बोलण्यास त्रास होत असल्याचं भाजपाचं म्हणणं असून, यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधीकडून संजय राऊत यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी वरील विधान केलं आहे.

“एखाद्यास निमंत्रित करून त्याचा अपमान करणं हे तुम्हाला शोभत नाही”

दरम्यान, कोलकात्ता येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीतील एका कार्यक्रमात, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाषणा अगोदर उपस्थित नागरिकांनी जय श्रीराम..अशा घोषणा दिल्याने, ममता बॅनर्जी प्रचंड संतपाल्या होत्या व त्यांनी भाषण करण्यास नकार देत, जाहीरपणे आपली नाराजी देखील व्यक्त केली होती. हा मुद्दा भाजपाकडून उचलून धरण्यात आला असून, जय श्रीराम..घोषणेवरून आता ममता बॅनर्जींवर निशाणा साधला जात आहे.

ममतांसाठी जय श्रीराम म्हणजे वळूला लाल कपडा दाखवण्यासारखं; भाजपा नेत्याची टीका

भाजपाचे हरयाणातील आरोग्यमंत्री अनिल विज यांनी ममतांवर टीकास्त्र डागलं आहे.  “ममता बॅनर्जी यांच्यासाठी जय श्रीराम म्हणजे वळूला लाल कपडा दाखवण्यासारखं आहे. त्यामुळेच त्यांनी व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये भाषण थांबवलं,” असं विज यांनी म्हटलं आहे.

मध्यप्रदेश विधानसभेचे हंगामी अध्यक्ष(प्रोटेम स्पीकर) आमदार रामेश्वर शर्मा यांनी पश्चिम बंगाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रामायणाची एक प्रत पाठवली आहे. विशेष म्हणजे ही माहिती त्यांनी स्वतः ट्विट्द्वारे दिली आहे.

ममता बॅनर्जींना मध्य प्रदेश विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांनी पाठवली रामायणाची प्रत, म्हणाले…

शर्मा यांनी म्हटले आहे की, “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रामायणाची प्रत पाठवली आहे. अपेक्षा आहे की, ममता दीदी रामायणाचे वाचन करतील, प्रभू श्रीरामाचे चरित्र समजतील आणि इथून पुढे जय श्रीरामच्या घोषणांचा विरोध करणार नाहीत.”