मुंबई पोलिसांविरोधात ‘जमात-ए-इस्लामी’ या संघटनेने १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा उच्च न्यायालयात दाखल केला आहे. पोलिसांच्या एका परिपत्रकाने प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप या संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
मार्च महिन्यात मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने एक परिपत्रक काढले होते. अंतर्गत वापरासाठी असलेले हे परिपत्रक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. जमात-ए-इस्लामीच्या ‘गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन’ या संघटनेमध्ये अतिरेकी प्रशिक्षण दिले जात असल्याचा संशय पत्रकात व्यक्त करण्यात आला होता. यावर संघटनेने तीव्र आक्षेप घेतला होता. याप्रकरणी हे पत्रक मागे घेऊन माफी मागण्याची संघटनेची मागणी होती. अखेर संघटनेची बदनामी केल्याप्रकरणी संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात १० कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तौफिक खान यांनी दिली.
जमात-ए-इस्लामीकडून दहशतवादी प्रशिक्षण दिले जाते, असा संशय मुंबई पोलिसांच्या परिपत्रकात व्यक्त करण्यात आला. या पत्रकाद्वारे संघटनेची बदनामी झाली आहे. त्यामुळे पोलिसांविरोधात १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
– तौफिक खान,
प्रदेशाध्यक्ष, जमात-ए- इस्लामी