देशातील २२ आयआयटी आणि धनबाद येथील स्कूल ऑफ माइन्स येथील १० हजार ५७५ जागांसाठी २२ मे रोजी घेण्यात आलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत जयपूरचा अमन बन्सल देशात पहिला आला आहे. तर राज्यातून मुंबईचा प्रिय शहा पहिला आला असून तो देशाच्या गुणवत्ता यादीत १६व्या स्थानावर आहे. कोटा येथील रिया सिंग देशात मुलींमध्ये पहिली आली असून भावेश धिंग्रा आणि कुणाल गोयल यांनी अनुक्रमे देशात दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर नवी मुंबईतील चिन्मय आवळे हा विद्यार्थी अनुसूचित जाती विभागातून पहिला आला आहे. गुणवत्ता यादीत अग्रस्थानी असलेल्या विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबई व संगणक विज्ञान शाखेला पसंती दिली आहे.

Untitled-2

जेईई मेन्समधील पहिले दोन लाख विद्यार्थी या आयआयटीमधील प्रवेशांसाठी घेण्यात येणाऱ्या जेईई अ‍ॅडव्हान्स या परीक्षेला पात्र ठरतात. यापैकी देशभरातून एक लाख ४७ हजार ६७८ विद्यार्थ्यांनी अ‍ॅडव्हान्साठी नोंदणी केली होती. यापैकी ३६ हजार ५६६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली. यात ३१ हजार ९९६ मुलांचा आणि चार हजार ५७० मुलींचा समावेश आहे. यावर्षी विद्यार्थ्यांना गोवा, छत्तीसगढ, जम्मू आणि कर्नाटक या चार आयआयटीमध्येही प्रवेश घेता येणे शक्य होणार आहे. यंदा १८ परदेशी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती यापैकी दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या गुणांच्या आधारे आयआयटीव्यतिरिक्त रायबरेली येथील राजीव गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी, विशाखापट्टणम येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी आणि तिरुवअनंतपुरम येथील इंडियन इंस्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थांमध्येही प्रवेश घेता येऊ शकतो.

या परीक्षेत देशात पहिला क्रमांक मिळवलेल्या अमनला ३२० गुण मिळाले असून त्याला आयआयटी मुंबईच्या संगणक विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. अमन किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेतही पात्र ठरला होता. मुंबईच्या प्रिय शहाने २८५ गुण्ॉमिळवले असून त्यालाही आयआयटी मुंर्बतच प्रवेश घेण्याची इच्छा आहे. प्रियनेही झुरिच येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही सहभाग नोंदवला होता. आपल्या अपेक्षेप्रमाणेच निकाल लागल्याची प्रतिक्रिया नोंदवली. अनुसूचित जाती विभागतून पहिल्या आलेल्या चिन्मयनेही शिकवणीवर्गाव्यतिरिक्त सहा तास अभ्यास करून हे यश मिळवल्याचे सांगत आयआयटी मुंबईत संगणक विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केली.

सुपर ३०चे यश

आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनीही आयआयटीत प्रवेश घ्यावा या उद्देशाने पटना येथील प्राध्यापक आनंद कुमार हे दरवर्षी ३० विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी प्रशिक्षण देतात. त्यांचा हा उपक्रम ‘सुपर ३०’ या नावाने ओळखला जातो. यावर्षी त्यांच्याकडील ३० पैकी २८ विद्यार्थ्यांना जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण करणे शक्य झाले आहे.