26 February 2020

News Flash

जेजेच्या डॉ. कटके पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

विद्यार्थिनीची मानसिक छळाची तक्रार

जे. जे. रुग्णालय

विद्यार्थिनीची मानसिक छळाची तक्रार

मुंबई : विद्यार्थ्यांची छळवणूक केल्याच्या आरोपप्रकरणी जे. जे. रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागातील प्राध्यापिका डॉ. राजश्री कटके पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. डॉ. कटके वैयक्तिक कामे करायला लावून मानसिक छळ करत असल्याची तक्रार रुग्णालयातील पदव्युत्तर विभागातील विद्यार्थिनीने निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेकडे केली आहे.

विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार डॉ. कटके यांची चौकशी करावी, अशी मागणी मार्ड संघटनेने सोमवारी रुग्णालय प्रशासनाकडे केली आहे. जे.जे. रुग्णालयातील पदव्युत्तरच्या दुसऱ्या वर्षांतील एका निवासी डॉक्टरने नुकतीच मार्डकडे डॉ. कटके यांच्या विरोधात लेखी तक्रार दिली आहे. डॉ. कटके त्यांच्या घरातील कामे करण्यास सांगतात, त्यांच्या मुलांच्या खरेदीच्या वेळी पिशव्या उचलण्यासाठी जबरदस्तीने सोबत नेतात, बाहेरगावी जाण्यासाठी तिकिटे काढायला लावतात आणि त्याचे पैसेही मुलांना द्यायला लावतात, असे या तक्रारीत म्हटले आहे. डॉ. कटके कार्यालयाबाहेर विनाकारण तासन्तास बसायला लावत असल्याने त्यातून मानसिक छळ तर होतोच, शिवाय आर्थिक भरुदडही बसतो, असेही या तक्रारीत नमूद केले आहे. सांगितलेली कामे न केल्यास करिअर आणि शिक्षणात खोडा घालण्याची धमकीही त्या देतात, असा आरोपही तक्रारपत्रात आहे.

या प्रकरणी डॉ. कटके यांची चौकशी करावी, अशी मागणी मार्डने रुग्णालय प्रशासनाकडे केली आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची दुसऱ्या विभागात नेमणूक करावी, त्यांना विद्यापीठ परीक्षांसाठी परीक्षक म्हणून नियुक्त करू नये अशी मागणीही मार्डने प्रशासनाकडे केली आहे.

डॉ. कटके विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातील वैयक्तिक कामे करायला लावतात. असे न केल्यास करिअरबाबत धमकी देतात, अशा तोंडी तक्रारी मार्डकडे येतच होत्या. मात्र लेखी तक्रार द्यायला कोणीही पुढे येत नव्हते. त्यामुळे आम्हालाही कारवाई करण्याची मागणी करता येत नव्हती. परंतु या विद्यार्थिनीने पुढाकार घेऊन तक्रार दिली आहे. याआधी आरोग्य विभागाच्या सचिवांकडेही तिने तक्रार दिली असल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. लोकेशकुमार चिरवटकर यांनी सांगितले.

कामा रुग्णालयातील एका प्राध्यापिकेने डॉ. कटके यांच्या मानसिक छळामुळेच गर्भपात झाल्याचा आणि नोकरी अर्धवट सोडावी लागल्याचा आरोप यापूर्वी केला होता.

चौकशीसाठी समिती

डॉ. कटके यांची चौकशी करण्यासाठी आठवडय़ापूर्वीच तीन सदस्यांची समिती नेमली आहे. पारदर्शीपणे चौकशी करून पुढील आठवडय़ात अहवाल दिला जाईल, असे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले.

‘त्या’ प्राध्यापकांना इशारा

उत्तीर्ण करण्यासाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील विविध विभागांचे प्राध्यापक पैसे आणि अन्य गोष्टींची मागणी करत असल्याच्या तोंडी तक्रारी मार्डकडे येत आहेत. हे अनैतिक प्रकार वेळीच बंद न झाल्यास या प्राध्यापकांचे पितळ उघडे पाडू, असा इशारा मार्डने दिला आहे.

विद्यार्थिनीने केलेले आरोप खोटे आहेत. स्वत:च्या चुका लपविण्यासाठी तिने तक्रार केली आहे.

– डॉ. राजश्री कटके

First Published on February 19, 2019 4:02 am

Web Title: jj the hospital dr rajshree katke again once in controversy
Next Stories
1 पाकिस्तानी कलाकारांना ‘बॉलीवूड’ची दारे बंद
2 मेधा गाडगीळ यांची सात दिवसांत दुसऱ्यांदा बदली
3 प्रतीक्षानगरची धुळधाण!
Just Now!
X