महाराष्ट्र सदन आणि अन्य आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सध्या अटकेत असलेले माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत विशेष न्यायालयाने गुरुवारी पुन्हा एकदा वाढ केली. दोघांच्या न्यायालयीन कोठडीत २७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. याआधी वाढ करण्यात आलेल्या कोठडीची मुदत आज संपल्याने दोघांचीही कोठडी वाढवून देण्याची मागणी अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) अ‍ॅड्. हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाकडे केली. ही मागणी मान्य करत न्यायालयाने भुजबळ काका-पुतण्याच्या कोठडीत २७ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.
दरम्यान, कालिना येथील राज्य ग्रंथालयप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही (एसीबी) भुजबळांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तसेच भुजबळ यांनी माजी सरकारी अधिकारी, सहकारी तसेच विश्वासू मंडळीमार्फत कोटय़वधी रुपयांचे गैरव्यवहार केलेला आहे. या माहितीची शहानिशा करणे आणि तपासादरम्यान उघड होणाऱ्या इतर बाबींची चौकशी अद्या करायची आहे. म्हणून दोघांच्याही कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती.