अवजड वाहनांना बंदी: जुहू चौपाटीकडे जाण्यासाठी एकमेव मार्ग

मुंबई: एसएनडीटी नाल्यावरील जुहू तारा पुलाचा अर्धा भाग अखेर वाहतुकीस सुरू करण्यात आला आहे.  गेल्या वर्षी जून महिन्यात बंद केलेला हा पूल वर्षभराने १ ऑगस्टपासून सुरू झाला आहे.

मात्र अवजड वाहनांना अद्यापही या पुलावरून परवानगी देण्यात आलेली नाही.

हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर पालिकेने पुलांचे पुन्हा सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात अनेक पुलांसह एसएनडीटी नाल्यावरील जुहू तारा मार्गावरील पूल धोकादायक आढळला होता. त्यामुळे गझदरबंद जंक्शनपासून जुहू चौपाटीपर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला होता. त्यानंतर या पुलाची संरचनात्मक तपासणी करण्यात आली होती. तसेच या पुलावर मोठय़ा प्रमाम्णावर डांबराचे व पेव्हर ब्लॉकचे थर जमा झाल्यामुळे पुलाचे वजन वाढल्याचे आढळून आले होते.

हे थर कमी करून त्याची दुरुस्ती करण्यात आली. दुरुस्तीनंतर वर्षभराने या पुलाचा अर्धा भाग वाहतुकीसाठी नुकताच खुला करण्यात आला आहे.

२८ मीटर रुंद असलेला हा पूल एसएनडीटी नाल्यावर आहे. हा पूल धोकादायक ठरल्यामुळे संपूर्ण रस्ताच बंद करण्यात आला होता. बांद्रा ते जुहूला जोडणारा जुहू तारा मार्ग हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहेच; पण जुहू चौपाटीकडे जाणारा हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक एस. व्ही. रोड तसेच विलेपाल्र्यातील वैकुंठलाल मेहता मार्गावरून वळवण्यात आली होती.

रहिवाशांना दिलासा

सध्या केवळ हलक्या वाहनांसाठी हा पूल सुरू करण्यात आला आहे. अवजड वाहनांनी पुलावरून जाऊ नये म्हणून उंची अटकाव लावण्यात आले आहेत. मात्र त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या किंवा येथून ये-जा करणाऱ्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.