गणपतीला कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. रेल्वेनेही कोकणवासीयांचा हा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वातानुकूलित प्रीमियम गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २८ ऑगस्टला सुटणाऱ्या या गाडीसाठी बुधवारपासून ऑनलाइन आरक्षण सुरू झाले. मात्र, आरक्षणासाठी सरसावलेल्या प्रवाशांना धक्काच बसला. वातानुकूलित तृतीय श्रेणीच्या एका तिकिटासाठी त्यांना तब्बल चार हजार रुपये मोजावे लागले!
प्रीमियम गाडीचे तिकीट प्रवासाची तारीख जवळ येते, तसतसे महाग होत जाते. विमानाच्या तिकिटाच्या धर्तीवरच या तिकिटाचे दर मागणीनुसार वाढतात. २८ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसहून करमाळीला रवाना होणाऱ्या ०२०४५ वातानुकूलित प्रीमियम विशेष या गाडीचे आरक्षण १३ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आले. हे आरक्षण सुरू झाल्यानंतर काही वेळातच तिकीट आरक्षणासाठी ऑनलाइन गेलेल्या महेश पार्टे यांना वातानुकूलित तृतीय श्रेणीची ३३० आसने अनारक्षित असल्याचे दिसले. त्यांनी तिकीट दर तपासले असता रेल्वेच्या संकेतस्थळावर एका तिकिटासाठी ११३० रुपये एवढा दर दिसत होता. पार्टे यांनी त्वरित आपल्या कुटुंबीयांसाठी या गाडीची पाच तिकिटे आरक्षित केली. पैसे भरण्यासाठी त्यांनी आपले क्रेडिट कार्ड वापरले. मात्र, आरक्षण पूर्ण झाल्यानंतर आलेल्या संदेशात या पाच तिकिटांसाठी     
तब्बल १९,५४७.४७ रुपये मोजावे लागल्याचे त्यांना दिसले. या आकडय़ामुळे हादरलेल्या पार्टे यांनी तातडीने रेल्वेच्या बुकिंग कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, प्रीमियम गाडीचे तिकीट अशाच चढय़ा दराने वाढते, असे उत्तर त्यांना मिळाले.आर. एस. सावंत यांनाही हाच अनुभव आला. त्यांनी लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी या गाडीचे कुडाळपर्यंतचे आरक्षण करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना ते मिळाले नाही. म्हणून त्यांनी थेट करमाळीपर्यंत आरक्षण आहे काय हे तपासले असता, ३२७ तिकिटे उपलब्ध असल्याचे दिसले. त्याचे शुल्क ११३० रुपये दाखवले जात होते. पण त्यांनी प्रत्यक्ष आरक्षण केल्यावर त्यांना एक तिकीट ३९०५ रुपयांना पडले. ही तर प्रवाशांची लूट आहे, अशी टीका सावंत यांनी केली.

मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी विमानाचे तिकीट साडेचार-पाच हजार रुपये आहे. मात्र, या प्रीमियम गाडीचे तिकीट आम्हाला प्रत्येकी चार हजार रुपयांना पडले आहे. हे तिकीट रद्द करण्याची सोयही नाही. त्यामुळे आमच्यासमोर पेच उभा राहिला आहे. वातानुकूलित प्रथम श्रेणीचे तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशांना तर ३० ते ४० हजारांचा भरुदड पडला आहे.     – महेश पार्टे, प्रवासी
नक्कीच काही तरी गोंधळ झाला असावा. मात्र, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून योग्य बाजू लवकरच प्रकाशात आणली जाईल.
– पिनाकीन मोरावाल, अधिकारी (आयआरसीटीसी)