कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोकण मार्गावर एका वातानुकुलित विशेष गाडीच्या चार फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगलोर या दरम्यान धावणार आहे. ही गाडी १० आणि १७ मे रोजी मुंबईहून मंगलोरला आणि त्याच दिवशी मंगलोरहून मुंबईला येईल.
०२१३३ डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगलोर ही गाडी १० आणि १७ मे रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री १२.४५ वाजता निघेल. म्हणजेच ही गाडी ९-१० आणि १६-१७ मेच्या मध्यरात्री निघणार आहे. ही गाडी त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता मंगलोरला पोहोचेल.
तर ०२१३४ अप मंगलोर-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी १० आणि १७ मे रोजी संध्याकाळी ८.३० वाजता निघून दुसऱ्या दिवशी दुपारी १.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
या गाडीत वातानुकुलित टू टायरचे दोन डबे आणि वातानुकुलित थ्री टायरचे १२ डबे असतील.
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, कुमटा, भटकळ, मूकांबिका रोड, बिन्दुर, कुंडपूरा, उडुपी आणि मुलकी या स्थानकांवर थांबणार आहे.