नृत्य अकादमीसाठी अंधेरी येथील मोक्याची जागा किरकोळ किमतीत शासनाकडून मिळविलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमामालिनी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. आपण ही जमीन बळकावलेली नाही, असे सांगून शासनाच्या नियमांचे पालन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेमामालिनी यांच्या नाटय़विहार कलाकेंद्र धर्मादाय संस्थेस सुमारे दोन हजार मीटर जागा शासनाने केवळ ७० हजार रुपयांमध्ये दिल्याने काँग्रेससह विरोधी पक्षांनी त्याविरोधात आवाज उठविला आहे. त्यामुळे हेमामालिनी यांनी यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका मांडली. मी अजून काहीही रक्कम शासनाला दिलेली नाही. त्यामुळे मला किरकोळ किमतीमध्ये ही जागा मिळाल्याचा मुद्दाच चुकीचा असून किती रक्कम भरायची आहे, हे मलाच माहीत नाही, असे हेमामालिनी यांनी सांगितले. तरी मी रक्कम भरण्यास तयार असून माझ्या संस्थेला किरकोळ किमतीमध्ये शासनाकडून जमीन दिली जात असल्याच्या मुद्दय़ाला अकारण महत्त्व दिले जात आहे.