मोबाइलमुळे देशातील लँडलाइनची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. यामुळेच मोबाइलप्रमाणेच लँडलाइनवरून फोन करण्यासाठीही कमी पैसे पडावे आणि त्याचा वापर वाढावा या उद्देशाने कॉलचे दर कमी करण्याचा निर्णय ‘ट्राय’ने घेतला आहे. यासाठी लँडलाइन सेवा पुरविणाऱ्या दोन कंपन्यांना द्यावा लागणारा आंतरजोडणी वापर दर रद्द करण्यात आला आहे. यामुळे लँडलाइनवरून लँडलाइनवर किंवा मोबाइवर फोन केला तरी कंपनीला दुसऱ्या कंपनीला आंतरजोडणी दर द्यावा लागणार नाही. यामुळे प्रतिकॉल २० पैसे खर्च कमी होणार आहे. याचबरोबर ट्रायने मोबाइलवरून लँडलाइनवर फोन करण्यासाठी द्यावा लागणारा आंतरजोडणी वापर दरात कपात करून हा दर २० पैशांवरून १४ पैसे करण्यात आला आहे. यामुळे लवकरच मोबाइलवरून लँडलाइनवर फोन करणेही स्वस्त होण्याची शक्यता आहे. वेगवान इंटरनेट जोडणीसाठी लोकांना लँडलाइनचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे, ट्रायने स्पष्ट केले.