उत्पन्न नसल्याने दुकानदार हवालदिल

समीर कर्णुक, लोकसत्ता

मुंबई : टाळेबंदीमुळे जवळपास दोन महिन्यांपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोडल्यास इतर व्यवसाय ठप्प असताना आणि व्यावसायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागत असताना दुकानमालकांकडून मात्र जागेच्या भाडय़ासाठी तगादा लावला जात आहे. काही दुकानांचे भाडे लाखाच्या घरात असते. परंतु उत्पन्नच नसताना भाडे कसे द्यायचे, हा मोठा प्रश्न दुकानदारांसमोर आहे.

संपूर्ण देशात २४ मार्चपासून टाळेबंदी आहे. केवळ किराणा, भाजी, औषधालये आणि रुग्णालयांना मुभा देण्यात आली आहे. तर इतर दुकाने सरसकट गेल्या दीड महिन्यापासून बंद आहेत. परिणामी दुकानदारांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. जागा भाडय़ाने घेऊन दुकाने चालवणाऱ्यांना तर मोठाच मनस्ताप आहे. दीड महिन्यापासून दुकान बंद असूनही दुकानाचे भाडे मालकांना वेळेवर द्यावे लागत आहे. ‘दुकानमालकांनी माणुसकी दाखवणे अधिक गरजेचे आहे. दुकानदार तोटय़ात असल्याने त्यांच्याकडून किमान टाळेबंदी सुरू असेपर्यंत भाडे घेऊ नये. अथवा काही प्रमाणात भाडे माफ करावे,’ अशी मागणी ‘चेंबूर नाका व्यापारी असोसिएशन’चे कुशल जैन यांनी के ली आहे.

एप्रिलचा संपूर्ण महिना दुकान बंद राहिल्याने, एक रुपयाचादेखील व्यवसाय झालेला नाही. त्यात मालाचे नुकसान झाले ते वेगळे. दुकान बंद असले तरी अनेकांना कामगारांना थोडाफार तरी पगार द्यावा लागत आहे. त्यामुळे दुकानदारांसमोर मोठय़ा अडचणी निर्माण झाल्या आहेत.

सरकारच्या फक्त सूचनाच

गेल्या महिन्यात राज्य सरकारने भाडय़ाच्या घरात राहणाऱ्यांना दिलासा दिला होता. घरमालकांनी भाडेकरूवर भाडय़ासाठी तीन महिने तरी तगादा लावू नये, अशा सूचना सरकारने घरमालकांना दिल्या होत्या. मात्र या सूचना पाळणे घरमालक किं वा दुकानमालक यांच्यावर बंधनकारक नसल्याने त्याचा किती उपयोग होईल, हा प्रश्नच आहे.

माझे केकचे दुकान असून महिन्याला ५० हजार इतके भाडे आहे. मात्र गेल्या दीड महिन्यात एक रुपयाचादेखील धंदा झालेला नाही. त्यातच कर्ज काढून मी हा व्यवसाय सुरू केल्याने, कर्जाचे हप्ते आणि दुकानाचे भाडे या दोन्हीचा भुर्दंड आहे. त्यातच दुकानमालक भाडय़ासाठी फोन करत असल्याने पैसे आणायचे कुठून, हा मोठा प्रश्न आहे.

– विशाल गवळी, दुकानदार