दारिद्रय़रेषेखालील व्यक्तींना न्यायालयात दाद मागण्यासाठी विधि प्राधिकरण नि:शुल्क वकील उपलब्ध करून देते. परंतु या वकिलानेच गरीब व्यक्तीकडे लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार मुलुंडमध्ये उघडकीस आला आहे. शेजाऱ्याशी भांडण झाल्यानंतर पोलिसांकडून समाधानकारक कारवाई न झाल्याने या गरिबाने महानगर दंडाधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती. खाण्यापिण्याची भ्रांत असलेल्या अशा व्यक्तीलाही नाडणाऱ्या वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तातडीने कारवाई करत पकडले.
कांजूरमार्ग येथे राहायला असलेला ४७ वर्षीय तक्रारदार परिसरातील इमारतींमध्ये उभ्या असलेल्या गाडय़ा, मोटारसायकल धुऊन आपली गुजराण करतो. त्याच्या पत्नीचे शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीबरोबर एप्रिल २०१५ मध्ये किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. त्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी शेजाऱ्याला केवळ समज देऊन सोडल्याने तक्रारदार समाधानी नव्हता. त्याने मुलुंडच्या महानगर दंडाधिकाऱ्याकडे धाव घेतली. दारिद्रय़रेषेखाली असल्याने दंडाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या विधि व न्याय विभागाकडे या कामगाराला वकील देण्याची विनंती केली. त्यानुसार, जयसिंग बनकर (४६) या वकिलाची नियुक्ती करण्यात आली. १६ मार्च रोजी कामगाराने बनकर यांची भेट घेतली. त्यावेळी, बनकरने वकीलपत्र घेण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी कामगार हादरला. पैसे देण्याची ऐपत नसल्याने त्याने थेट वरळीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात धाव घेतली. त्याच्या तक्रारीची तातडीने दखल घेत विभागाने पडताळणीसाठी कामगाराला वकिलाशी तडजोड करण्यास सांगितले. त्यावेळी बनकरने तीन हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दाखवली. अखेर, बुधवारी महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आवारात रक्कम स्वीकारताना बनकरला पकडले.