‘मेट्रो-३’ची धडक बसणाऱ्या काळबादेवी, चिराबाजार आणि गिरगाव परिसरातील २८ इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत केवळ तोंडी आश्वासने देण्यात येत असल्यामुळे संतप्त झालेल्या चिराबाजार-गिरगावकरांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रप्रपंच केला आहे. काळबादेवी टपाल कार्यालयाबाहेरील टपालपेटीत तब्बल पाच हजार रहिवाशांनी ‘मेट्रो-३’च्या विरोधात घोषणाबाजी करीत मुख्यमंत्र्यांसाठी पत्रे टाकली.
‘मेट्रो-३’च्या स्थानकांसाठी काळबादेवी, चिराबाजार, गिरगाव परिसरातील २८ इमारती तोडाव्या लागणार आहेत. या इमारतींमधील रहिवाशांचे शक्यतो मूळ जागीच पुनर्वसन करण्याचे आश्वासन मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (एमएमआरसी)च्या संचालिका अश्विनी भिडे देत आहेत. तसेच  देवेंद्र फडणवीस यांनीही येथील प्रकल्पग्रस्तांना दुप्पट क्षेत्रफळाचे घर देण्याचे आश्वासन दिले आहे. केवळ तोंडी आश्वासने मिळत असल्याने या परिसरातील रहिवासी संतप्त झाले आहेत. चिराबाजार-गिरगाव बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी काळबादेवी टपाल कार्यालयाबाहेर रहिवाशांनी आगळेवेगळे आंदोलन करून थेट मुख्यमंत्र्यांना पत्रप्रपंच केला.
‘मुख्यमंत्री हाय हाय’, ‘अश्विनी भिडे हाय हाय’ अशा घोषणा देत रहिवाशांनी परिसर दणाणून सोडला होता. ‘मेट्रो-३’ जगन्नाथ शंकरशेट मार्गाऐवजी महर्षी कर्वे मार्गावरून वळवावी, अशी मागणी बहुतांश रहिवाशांनी आपल्या पत्रामध्ये केली आहे. खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, माजी आमदार रवींद्र मिर्लेकर, स्थानिक नगरसेवक संपत ठाकूर आदींनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून रहिवाशांची बाजू मांडली आहे.
‘मेट्रो-३’च्या माध्यमातून या विभागाचा विकास करायचा असेल तर काळबादेवी, चिराबाजार, गिरगाव टापूतील सर्वच इमारती सरकारने ताब्यात घ्याव्यात आणि त्याच ठिकाणी उंच इमारती उभाराव्यात. त्यामुळे मोडकळीस आलेल्या चाळींचा प्रश्न सुटेल आणि या भागातील मूळ ठिकाणीच चांगले घर मिळेल. पर्यायाने ‘मेट्रो-३’चा तिढाही सुटेल, असा पर्याय या भागातील प्रकल्पग्रस्त रहिवासी वीरेन वसा यांनी सुचविला आहे.
मुख्यमंत्र्यांनी दुप्पट घर देण्याची केवळ घोषणा केली आहे. पुनर्वसनाबाबत अध्यादेश जारी करून रहिवाशांसाठी ठोस उपाययोजना जाहीर करावी, असे आवाहन कृती समितीचे निमंत्रक पांडुरंग सकपाळ यांनी या वेळी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले.