पहिल्या पावसानंतर पावसाळी आजारांमध्ये विशेषत: तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असते. बुधवारी चक्रीवादळामुळे आणि पावसामुळे येत्या आठ ते दहा दिवसांत तापाचे व इतर आजारांचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे करोनाचे रुग्ण आणि अन्य आजारांचे रुग्ण ओळखणे कठीण जाणार आहे.

करोनाचा भर ओसरत नाही तोच आता पावसाळी आजारांचा सामना करावा लागणार आहे. येत्या ७ ते १० दिवसात हे सर्व आजार, तापाच्या रुपाने डोके वर काढणार आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या तापाकडे दुर्लक्ष करू नये व स्वत: औषधोपचार करू नये असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले  आहे.

लक्षणांवर लक्ष ठेवा

सर्दी, खोकला, सांध्यातील वेदना, अंगावर चट्टे उठणे, श्वास लागणे, अतिसार, उलटय़ा होणे, घसा खवखवणे, कावीळ यासारखी काही लक्षणे आढळल्यास नजीकच्या दवाखान्यात तपासणी करून घ्या किंवा आरोग्य सेविकांना कळवा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

काळजी घ्या..

* मधुमेह, उच्च रक्तदाब अशा दीर्घ कालीन आजारांच्या रुग्णांनी आपली औषधे नियमित घ्यावी,

* ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर जाऊ नये,

* आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, डासांची पैदास होणार नाही याची काळजी घ्यावी त्याकरीता कुठेही डबक्यात पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.

* घरात शिजवलेले ताजे अन्न खावे

* करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हात वारंवार स्वच्छ धुवावे, खोकणे—शिंकणे याबाबतचे नियम पाळावे, सामाजिक अंतर पाळावे.