‘म्हाडा’तर्फे काढण्यात आलेल्या घरांच्या सोडतीमध्ये विजयी ठरलेल्या गिरणी कामगारांच्या गृहकर्जाचा मार्ग सुकर व्हावा याकरिता कर्ज मिळविण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करणारे काही महत्त्वाचे निर्णय मुंबई बँकेतर्फे घेण्यात आले आहेत.
याबाबत झालेल्या बैठकीतील निर्णयांनुसार, मुंबईबाहेर राहणाऱ्या गिरणी कामागारांना मुंबईमध्ये सोडतीद्वारे जे घर लागले आहे तेच त्यांचे मुंबईतील वास्तव्य समजून त्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. उत्पन्नाबाबत गिरणी कामगाराच्या घराचे भाडे हेच कर्जावरील हप्ते भरण्याचे साधन समजून कर्ज मंजूर करण्यात येईल. तसेच घराचे किमान मासिक भाडे १२ हजार रुपये हजार धरण्यात येईल.
घराचा ताबा मिळण्यास विलंब झालेल्या कर्जदारास हप्त्यामध्ये वाढीव वेळ देण्याचाही निर्णय घेण्यात आला असून कर्ज वितरणासाठी म्हाडा व बँक यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत होणारी गैरसोय दूर करण्यासाठी बँकेच्या मुख्य कार्यालयात एक खिडकी योजना करण्यात येईल.
कर्ज प्रक्रिया बँकेच्या मुख्य कार्यालयातून मंजूर करण्यात येईल व कामगारांच्या घराजवळील बँकेच्या शाखेतून सेवा देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयांमुळे सोडतीत विजेत्या ठरलेल्या मात्र पैसे भरण्यास असमर्थ असलेल्या गिरणी कामगारांचा घर मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गिरणी कामगारांच्या कर्ज मिळविण्याच्या प्रक्रियेतील जाचक अटी व कर्ज मिळविण्याकरिता होत असलेल्या विलंबाबाबत माजी खासदार मोहन रावले यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांच्या विविध संघटनांनी मुंबई बँकेचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे तसेच कार्यकारिणी सदस्यांची भेट घेतली. त्यात हे निर्णय घेण्यात आले.