परवानगी असलेल्या प्रवाशांनाच स्थानकात प्रवेश

मुंबई : राज्य सरकारने लागू केलेल्या नवीन निर्बंधानुसार आजपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या लोकल प्रवासावर बंधने येणार आहेत.

गेल्यावर्षी टाळेबंदीनंतर लोकल सेवा खंडित केली होती. त्यानंतर १५ जूनपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र गर्दी टाळण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली नव्हती. त्यानंतर करोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्यावर १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य नागरिकांना ठरावीक वेळेत लोकलमधून प्रवास करण्याची मुभा दिली होती. त्यानुसार सकाळी ७ वाजेपूर्वी, दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत आणि रात्री ९ नंतर सर्वसामान्य नागरिक लोकलमधून प्रवास करू शकत होते. गर्दी टाळण्यासाठी हे निर्बंध घालण्यात आले होते. मात्र सध्या राज्यात पुन्हा करोनाचा उद्रेक झाल्याने सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे योग्य कारणाशिवाय नागरिकांना घराबाहेर पडण्यावर बंधन घालण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवासाची मुभा दिली गेली आहे. त्यातून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवासावर बंधने येणार आहेत. याबाबत रेल्वेकडून तयारी सुरू केली गेली आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, पोलीस दलातील कर्मचारी, सरकारी कार्यालयातील कर्मचारी, बँक, वित्त आणि विमा सेवा कर्मचारी आदींना लोकलमधून प्रवास करता येईल.

दरम्यान स्थानकाच्या प्रवेशद्वारावर रेल्वे पोलीस आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ज्या संवर्गातील नागरिकांना प्रवासास मुभा दिली आहे, त्यांनाच स्थानकात प्रवेश दिला जाईल. त्यासाठी नागरिकांचे अधिकृत ओळखपत्र तपासले जाईल. त्याचबरोबर अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त विनाकारण फिरणाऱ्यांना प्रवासास परवानगी दिली जाणार नाही, अशी माहिती रेल्वे पोलीस दलातील अधिकाऱ्याने दिली.

‘राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देणार आहोत. त्यानुसार रेल्वेने तयारी केली आहे,’ अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. ज्या नागरिकांना प्रवासाची मुभा दिली आहे त्यांनाच आम्हीच प्रवासाची परवानगी देऊ, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.