16 December 2017

News Flash

वस्तू व सेवा कराचे उद्या ‘लोकसत्ता विश्लेषण’

‘टीजेएसबी सहकारी बँक लि.’ या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत.

प्रतिनिधी, मुंबई | Updated: June 19, 2017 1:59 AM

देशाच्या कररचनेत आमूलाग्र बदल घडविणारा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) येत्या १ जुलैपासून लागू होत असून या कराचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करणारा कार्यक्रम ‘लोकसत्ता विश्लेषण’ उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आला आहे. मंगळवारी, २० जून रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ आर्थिक व राजकीय विश्लेषक अजित रानडे व ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर हे वस्तू आणि सेवा कराचे तपशीलवार विश्लेषण करतील. तसेच श्रोत्यांशी संवाद साधून ते या करप्रणालीबाबतच्या त्यांच्या शंकांचे निरसनही करतील. ‘टीजेएसबी सहकारी बँक लि.’ या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत.

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दृष्टीने, तसेच एकंदर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने कमालीचे महत्त्व असलेला वस्तू आणि सेवा कर येत्या जुलैपासून अमलात येणार आहे. त्यासाठी सरकारी पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे.

कराची अंमलबजावणी थोडी पुढे ढकलावी, अशी मागणी काही घटकांतून होत असली, तरी १ जुलैचा मुहूर्त गाठण्यासाठी सरकार उत्सुक आहे. हा कर लागू झाल्यानंतर इतर कुठले कर गैरलागू होतील, वस्तू आणि सेवा कराचे सामान्यांसाठी फायदे काय आहेत, व्यापाऱ्यांच्या रोजच्या व्यवहारांवर त्याचा काय परिणाम होईल, उद्योगांना त्याचा कसा लाभ होईल, असे या कराबाबतचे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत. त्यांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ते उत्सुक आहेत.

सामान्यांना त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळावीत, या हेतूनेच ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

येत्या मंगळवारी, २० जून रोजी संध्याकाळी सहा वाजता ‘लोकसत्ता विश्लेषण’मध्ये सहभागी होण्याची, आपल्या मनातील वस्तू आणि सेवा कराबाबतचे प्रश्न अजित रानडे व  गिरीश कुबेर यांना विचारण्याची संधी वाचकांना मिळेल. या कार्यक्रमात प्रवेश विनामूल्य आहे.

  • कुठे? स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, वीर सावरकर मार्ग, दादर.
  • कधी? मंगळवार, २० जून, संध्याकाळी सहा वाजता.
  • प्रवेश विनामूल्य. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. काही जागा राखीव.

 

First Published on June 19, 2017 1:59 am

Web Title: loksatta analysis on gst 2