‘लोकसत्ता’ दिवाळी अंकाने दरवर्षीप्रमाणे यंदाही वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक उद्बोधन आणि रंजकता यांची सांगड घालण्याचा आपला वसा कायम राखला आहे. गेल्या वर्षभरात देशातील उदारमतवादी सहिष्णू वातावरणाला लागलेले ग्रहण हा आज सार्वत्रिक चिंतेचा विषय आहे. याची दखल घेत ‘उदारमतवादाची पीछेहाट’ या चर्चेत डॉ. अरुण टिकेकर, गिरीश कुबेर, विनय सहस्रबुद्धे आणि अजित अभ्यंकर यांनी या संकल्पनेच्या विविध पैलूंचा परामर्ष घेतला आहे.
याच्याच जोडीने आणखी एका वेगळ्या विषयाकडे जाताना जगभरातील निरनिराळ्या शहरांची फुप्फुसे असलेल्या जंगलांवर प्रकाश टाकला आहे- डॉ. उल्हास राणे, वैशाली करमरकर (जर्मनी), विश्वास अभ्यंकर (अ‍ॅमस्टरडॅम), डॉ. प्रियांका देवी-मारुलकर (पॅरिस) आणि प्रशांत सावंत (लंडन) यांनी. याच विषयाचे विस्तृत साहित्यरूप म्हणजे कवी गुलजार यांच्या झाडांवरील तरल कवितांचा खास विभाग!
यावर्षी पावसाने दगा दिल्याने देशातील अनेक राज्यांना अवर्षणास तोंड द्यावे लागत आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशातील अवर्षणग्रस्त प्रदेशांत कशा तऱ्हेने त्याचे नियोजन केले जाते याचा साद्यन्त वृत्तान्त कथन केला आहे डॉ. संहिता जोशी यांनी.. ‘सुबत्तेच्या देशातला दुष्काळ’ लेखात!
अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी त्यांच्या अभिनय तसेच लेखकीय आयुष्याला वळण देण्यास निमित्त ठरलेल्या व्यक्तींवर लिहिलेला कृतज्ञता-लेख वाचकांचे कुतूहल जागवणारा आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘नष्टनीड’ या कादंबरीवर आधारित सत्यजित राय यांच्या ‘चारुलता’ या चित्रपटातील अव्यक्त प्रेमत्रिकोण प्रत्यक्षात रवींद्रनाथ आणि सत्यजित राय यांच्याही व्यक्तिगत आयुष्यात कसा निर्माण झाला होता, हे चितारणारा विजय पाडळकर यांचा विलक्षण उत्कट लेख संवेदनशीलांची जिज्ञासा जागृत करणारा ठरावा.
कन्नड साहित्याच्या अधिकारी अनुवादक डॉ. उमा कुलकर्णी यांनी सांगितलेले अनुवादाभव, स्वातंत्र्यपूर्व काळातील तिसरे आगाखान या आगळ्या व्यक्तिमत्त्वाची न्या. नरेंद्र चपळगावकरांनी करून दिलेली ओळख, नाटय़-समीक्षक माधव वझे यांनी फ्रान्समधील ‘अविन्यो’ या नाटकवेडय़ा गावाचा करून दिलेला परिचय, डॉ. रवी बापट यांनी आपल्या लेखनाची केलेली शल्यचिकित्सा, नाटय़-चित्रपट क्षेत्रांतील सौमित्र तथा किशोर कदम, मुक्ता बर्वे, गुरू ठाकूर, प्रसाद ओक आणि जितेंद्र जोशी यांच्या कवितांचा खास विभाग, तरुणाईच्या संगीताची चर्चा करणारे डॉ. आशुतोष जावडेकर, गंधार संगोराम आणि जसराज जोशी यांचे लेख, ‘आर्टुनिस्ट गोपुलु’ हा प्रशांत कुलकर्णीचा एका आगळ्या चित्रकाराचा परिचय करून देणारा लेख, तसेच व्हेनिसच्या बिएनालेची गोष्ट सांगणारा अभिजीत ताह्मणे यांचा लेख, प्राचीन ‘स्मार्ट सिटीज्’वर झोत टाकणारा रवि आमले यांचा लेख, साहित्य आणि जीवन यांचा जैविक संबंध उलगडून दाखवणारा आसाराम लोमटे यांचा लेख, विनायक पाटील यांनी जगावेगळ्या वृक्षाची सांगितलेली कहाणी, त्याचप्रमाणे ज्योतिर्विद आदित्य भारद्वाज यांचे वार्षिक राशिभविष्य अशा वैविध्यपूर्ण साहित्याची मेजवानी यंदाच्या ‘लोकसत्ता’ दिवाळी अंकात आहे.
आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी जॉर्ज फर्नाडिस यांच्या पुढाकाराने योजलेल्या बडोदा डायनामाइट कटातील सहभागी डॉ. जी. जी. पारिख आणि बच्चूभाई शहा यांच्या आठवणींवर आधारित लेख अंकाला वेगळे परिमाण देणारा आहे.
****
आयसिसचा अक्राळविक्राळ दहशतवाद जगड्व्याळ रूप धारण करतो आहे. त्याची पाळेमुळे आणि त्यामागच्या कारणांचा शोध घेणारा विशाखा पाटील यांचा लेख..
****
पानिपत युद्धात युद्धकैदी झालेल्या मराठय़ांचे पुढे काय झाले, त्यांचे वंशज आज काय करताहेत, याचा मागोवा घेणारा आनंद शिंदे यांचा शोधलेख वाचकांची तृष्णा भागवतील.

ज्येष्ठ रंगकर्मी व चित्रपटकार सई परांजपे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला अभिनेते नासिरुद्दिन शाह यांच्या संघर्षकाळातील ‘बेबंद दिवसां’चे वर्णन करणारा त्यांच्या आत्मकथनातील अंश- हे या अंकाचे आणखीन एक वैशिष्टय़.