राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह २०२१’ मध्ये बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचं कौतुक केलं आहे. करोना कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंसारखं नेतृत्व राज्याला लाभलं ही नियतीची इच्छा म्हणावी लागेल, अशा शब्दांमध्ये सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांनी राज्यामध्ये करोना काळात गुंतवणूक वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांच्यासह उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये आज हा कार्यक्रम पार पडला.

मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाउननंतर राज्य सरकारने कशाप्रकारे राज्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न केले याचा लेखाजोखा देसाई यांनी आपल्या भाषणामधून मांडला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक करताना, मुख्यमंत्र्यांनी करोनासंदर्भातील टास्क फोर्सबरोबरच उद्योगांसंदर्भातील निर्णय आणि समन्वयासाठीही वेगळी टास्क फोर्स बनवली होती असं सांगितलं. या टास्क फोर्सच्या माध्यमातून उद्योजकांना सरकारकडून काय अपेक्षा आहेत आणि सरकारच्या उद्योजकांकडून काय अपेक्षा आहेत यासंदर्भात अधिक स्पष्टता आली. तसेच सरकारने करोना कालावधीमध्ये कंपन्या, मोठे उद्योग आणि तेथील कर्मचाऱ्यांसाठी बनवलेले नवीन नियम आणि करण्यात आलेल्या बदलांच्या माहितीची अधिक सोयीस्करपणे देवाणघेवाण शक्य झाल्याचं देसाई म्हणाले. या सर्व गोष्टींमुळेच कामाचा उत्साह वाढला आणि उद्योजकांनाही राज्याचं अर्थचक्र सुरु ठेवण्यासंदर्भात मोलाची भूमिका बजावली असं मत देसाई यांनी व्यक्त केलं.

करोना काळातील गुंतवणुकीबद्दल दिली माहिती…

करोनाच्या संकट ओढावल्यानंतरच्या कालावधीत महाराष्ट्रामध्ये ६० कंपन्यांनी गुंतवणूक केली असून एकूण दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या कालावधीमध्ये राज्यात झाली असल्याची माहितीही देसाई यांनी दिली.  जगभरातील वेगवेगळ्या कंपन्या राज्यामध्ये गुंतवणूक करत असून लॉकडाउननंतर राज्य सरकारने योग्य नियोजन करुन राज्याचं अर्थचक्र सुरु राहील यासंदर्भात काळजी घेतल्याचं देसाई यांनी सांगितलं. तसेच राज्यामध्ये डेटा सेंटर्स, फ्लिपकार्ट, अॅमेझॉनसारख्या परदेशी कंपन्यांच्या माध्यमातून झालेली रोजगार निर्मिती याबद्दलही देसाई यांनी माहिती दिली. महाराष्ट्रामध्ये करोना कालावधीत ६० कंपन्यांनी एकूण दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचं देसाई यांनी सांगितलं. तसेच ही गुंतवणूक केवळ कागदोपत्री नसून प्रत्यक्षात कामालाही सुरुवात झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ७० टक्के उद्योगांना जमिनींचं वाटप करण्यात आलं असून यापैकी एकही करार बारगळणार नाही असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचंही भाषण झालं. करोना काळामध्येही राज्याचं अर्थचक्र सुरु राहण्यासंदर्भात करण्यात आलेल्या आणि औद्योगिक क्षेत्रातील भविष्याच्या वाटचालीसंदर्भात माहिती दिली. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी करोना कालावधीमध्ये महाराष्ट्राला संभाळण्याचं काम सर्वांनी मिळून केल्याचं सांगत आभार मानले. सर्वांच्या सहकार्यानेच कठीण कालावधीमधून आपल्याला वाटचाल करणं शक्य झाल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं. या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांआधी सुभाष देसाई आणि आदिती तटकरे यांची भाषणं झाली. या भाषणांमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांनी करोनाच्या कठीण कालावधीमध्ये राज्याला सक्षम आणि आर्थिक विकासाचा विचार करणारं नेतृत्व दिल्याबद्दल भाष्य केलं. याचाच संदर्भ घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात, “माझं कौतुक होत आहे की या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये कसं नेतृत्व केलं; कसा महाराष्ट्र संभाळला. पण हे श्रेय आहे ते माझं एकट्याचं नाही. माझे मंत्रीमंडळातील सहकारी, प्रशासनातील सर्व अधिकारी, सारे कर्मचारी अगदी सफाई कर्माचारी सुद्धा आणि साहजीकपणे आपल्या राज्यातील नागरिक तसेच प्रसारमाध्यमांनी दिलेली साथसोबत महत्वाची ठरली. तुम्ही जी साथ देत आहात ती त्यावेळेला दिली नसती तर हे कठीण होतं,” असं म्हणत सर्वांचे आभार मानले.

एक लाख कोटी डॉलरची क्षमता गाठण्याच्या दिशेने सुरू असलेल्या राज्याच्या औद्योगिक महागाथेचा, औद्योगिक प्रगती आणि तिला पूरक पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलांचा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह २०२१’ चं आयोजन करण्यात आलं आहे. या बहुसत्रीय परिषदेत राज्याच्या भविष्यातील वाटचालीचा वेध घेतला जात असून रूपरेखा मांडली जात आहे. या परिसंवादातून औद्योगिक क्षेत्रातील बदल व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कोणकोणत्या उपाययोजना करत आहे याचा आराखडा समोर आणण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

देशातील औद्योगिक उत्पादनाच्या १५ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते आणि या क्षेत्रातून मिळणाऱ्या एकू ण महसुलापैकी जवळपास ४० टक्के महसूल हा महाराष्ट्रातून मिळतो. स्वातंत्र्यानंतर गेली सात दशके महाराष्ट्राने विविध उद्योगांच्या विकासाचे सारथ्य के ले. अनेक मोठे उद्योग-हजारो लघु व मध्यम उद्योग व त्यात काम करणारे लाखो अधिकारी-कर्मचारी असा महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राचा विस्तार आहे. करोनाच्या काळात आता अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी राज्य सरकार उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करत आहे आणि उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या कोणत्या व त्यावर उपाय काय या अनुषंगाने या परिसंवादात आढावा घेण्यात येत आहे.

प्रायोजक

मुख्य प्रायोजक: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

साहाय्यक: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सिडको कपॅसिटे इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि.

कॉर्पोरेट पार्टनर: कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय)