नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचा आणि स्त्रीशक्तीच्या गौरवाचा सण. वेगवेगळ्या क्षेत्रांत स्वत:चे अढळ स्थान निर्माण करणारी आजची स्त्री सामाजिक बदलांसाठीही ठामपणे उभी राहते आहे. ‘लोकसत्ता’ने गेली तीन वर्षे या स्त्रीशक्तीचा सन्मान केला तो ‘शोध नवदुर्गाचा’ या उपक्रमाद्वारे. यंदाच्या, चौथ्या वर्षीही या उपक्रमाद्वारे समाजातल्या नऊ कर्तृत्ववान स्त्रियांचा शोध घेऊन त्यांना गौरविण्यात येणार आहे. ‘केसरी’ या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत.

दुष्टांचे निर्दालन करणारी दुर्गा. आपल्या अवतीभवती अशा अनेक दुर्गा आहेत. गेल्या तीन वर्षांत अशा २७ कर्तृत्ववान दुर्गाचा सत्कार करण्यात आला. त्यातील कोणी संशोधन क्षेत्रात कर्तृत्व गाजविणारी, कोणी जंगल वाचविणारी, कोणी अंध, अपंग, विकलांग रुग्णांची काळजी घेणारी, कोणी स्वत: अंध असूनही अंधांना स्वयंपूर्ण बनविणारी, कोणी विधवांना सन्मानाचे जगणे देणारी, तर कोणी भ्रूणहत्या, कर्करोगाविरोधात जनजागृती करणारी दुर्गा. अशा अनेक नवदुर्गा समाजात निरपेक्ष भावनेने काम करत आहेत.

सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, तंत्रज्ञान, विज्ञान, मनोरंजऩ, उद्योग किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो. उच्च ध्येय समोर ठेवून नियमित किमान पाच वष्रे ठोस विधायक कार्य करणाऱ्या तुमच्या आमच्यातल्याच स्त्रीशक्तीला समाजापुढे आणण्याचा आणि तिच्या कर्तृत्वाला सलाम करणे हा या उपक्रमाचा हेतू. वाचकांनी पाठवलेल्या माहितीतूनच या उपक्रमासाठी असामान्य कर्तृत्व केलेल्या नऊ  ‘दुर्गा’ची निवड करण्यात येणार आहे. चला तर, नवदुर्गाच्या शोधात सहभागी व्हा!