विधायक समाजकार्य उभे राहिले, तर दिव्याने दिवा लागत जावा, तसे मदतीचे हात पुढे येतात, याचे प्रत्यंतर ‘लोकसत्ता’ आयोजित ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमादरम्यान येत आहे. या उपक्रमांतर्गत डोंबिवलीतील ‘मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेची माहिती आणि कार्याची ओळख ‘लोकसत्ता’च्या १४ सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर वरळी येथे याच नावाने कार्यरत असलेल्या संस्थेने तातडीने ‘मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट, डोंबिवली’ या संस्थेला एक लाख रुपयांची मदत केली आहे.
‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी निवासी आधार केंद्र अशा स्वरूपात काम करणाऱ्या डोंबिवली येथील ‘मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट’च्या कार्यावर प्रकाश टाकला गेला. संस्थेची माहिती, संस्था स्थापनेमागचा उद्देश, सध्या संस्थेला येणाऱ्या अडचणी, त्या अडचणींशी लढत पुढे जाण्याची संस्थेच्या कार्यकर्त्यांची जिद्द या सर्वाचेच प्रतिबिंब ‘लोकसत्ता’ने वाचकांसमोर ठेवले. या संस्थेच्या कार्याबाबत माहिती मिळाल्यानंतर लगेचच वरळीच्या ‘मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट’ याच नावाच्या संस्थेने या संस्थेला भरघोस मदत करण्याचे ठरवले. राज्यमंत्री सचिन अहिर आणि त्यांची पत्नी संगीता अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या वरळीच्या या संस्थेत महिलांना स्वबळावर उभे राहण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेतर्फे मदत म्हणून तातडीने एक लाख रुपयांचा धनादेश ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाद्वारे देत असल्याचे पत्र धनादेशासह संस्थेचे सचिन अहिर आणि संचालिका संगीता अहिर यांनी पाठवले. डोंबिवलीच्या मैत्री चॅरिटेबल ट्रस्टला हक्काची जागा मिळवून देण्यासाठी सरकारी पातळीवर जी कायदेशीर मदत लागेल, ती करण्याचा आपण प्रयत्न करू, असे आश्वासनही राज्यमंत्री सचिन अहिर यांनी दिले आहे.