* लॉटरी जिंकल्याचे सांगून लूटमार करणाऱ्या पाच जणांना अटक
* १६१ डेबिट-एटीएम कार्डे जप्त
कोटय़वधी रुपयांच्या परकीय चलनाची लॉटरी तुम्हाला लागली आहे. ही रक्कम मिळविण्यासाठी सुरुवातीला काही रक्कम भारतीय चलनात भरावी लागेल, असे सांगून एका टोळीने गेल्या दोन वर्षांत एक कोटी ४० लाख रुपये लुटल्याचे उघड झाले आहे. मुंबई पोलिसांच्या वाहनचोरी विरोधी पथकाने एका वेगळ्या प्रकरणाचा तपास करताना या टोळीचा छडा लावला आहे. या टोळीकडून २४ बँकांची १६१ डेबिट तसेच एटीएम कार्डे, १२० चेकबुकही पोलिसांनी हस्तगत केले आहे. विशेष म्हणजे या टोळीने राष्ट्रीयकृत बँकेत बनावट कागदपत्रे सादर करून खाती उघडली आहेत.
या प्रकरणी कमर यासीन शेख ऊर्फ कमर इब्राहिम शेख ऊर्फ राहुल गुप्ता (३५), समीर सावंत उर्फ मोहम्मद कलीम शेख उर्फ अब्दुल रेहमान शेख ऊर्फ सागर सुर्वे उर्फ राजेश भोज (२२), सय्यद अली अब्बास ऊर्फ राजेश चव्हाण उर्फ रजा अतिक खान ऊर्फ सुनील यादव (३५), किरण जाधव ऊर्फ महेश भानुशाली ऊर्फ करन रमेश शर्मा (३५) आणि मोहम्मद सर्फराज नूरआलम नदाफ ऊर्फ अ‍ॅलेक्स जोसेफ डिसुझा (२५) या पाचजणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने शेकडो लोकांना लॉटरी लागली असे सांगून फसविले आहे. त्यांची रक्कम या बनावट खात्यात आरटीजीएस पद्धतीद्वारे जमा करून नंतर डेबिट वा एटीएम कार्डे वापरून ती काढली गेली. ही रक्कम एक कोटी ४० लाख रुपये असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास गंगावने यांनी सांगितले.
बनावट पॅनकार्डे, मोटर वाहन परवाने बनविणाऱ्या टोळीबाबत गंगावणे यांच्या पथकाला माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पाळत ठेवून ही टोळी उद्ध्वस्त केली. या पाचही जणांकडे असलेल्या बँक खात्यात तब्बल एक कोटी ४० लाख रुपये जमा झाल्याची माहिती मिळविण्यातही पोलिसांना यश मिळाले.
देशभरातील अनेकांना या टोळीने अशा पद्धतीने गंडा घातला असल्याची माहिती सहआयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांनी दिली. ही टोळी वेगवेगळी नावे धारण करून प्रामुख्याने राष्ट्रीयकृत बँकेतच खाती उघडत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. आपले छायाचित्र ठेवून उर्वरित बनावट कागदपत्रे सादर करून खाती उघडण्याची त्यांची पद्धत होती. याच कागदपत्रांच्या आधारे मोबाईलची सिमकार्डेही त्यांनी मिळविली होती, असेही पोलिसांनी सांगितले.