एकांतात अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांवर कारवाईचा निर्णय घेणाऱ्या पोलिसांनी आपल्या भूमिकेत बदल करत या युगुलांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांवर कारवाईचा निर्णय घेऊन त्यांना अभय दिले आहे. निर्जन ठिकाणी जाणाऱ्या युगुलांवर कारवाई करण्याचा निर्णय दिल्ली बलात्काराच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी घेतला होता. परंतु या निर्णयाविरोधात गाजावाजा झाल्याने त्यात गुरुवारी संध्याकाळी बदल करण्यात आला. ज्या निर्जन ठिकाणी जोडपी जातात, त्या ठिकाणी पोलीस गस्त वाढवून समाजकंटकांना आळा घातला जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त अंबादास पोटे यांनी सांगितले.
दिल्ली घटनेनंतर मुंबई पोलिसांनी सार्वजनिक परंतु निर्जन ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. १४ जानेवारीला विशेष शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त नवल बजाज यांनी मुंबईतल्या सर्व पोलीस ठाण्यांना पत्र पाठवून अशा जोडप्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या जोडप्यांना समाजकंटकांकडून त्रास होऊ शकतो. मुलींवर अत्याचार होऊ शकतात. प्रसंगी त्यांची हत्याही होऊ शकते, असे या पत्रात नमूद करण्यात आले होते. मरिन ड्राईव्ह, बॅण्ड स्टँड, जुहू चौपाटी, गिरगाव आणि वरळी आदी ठिकाणी अशी अश्लील चाळे होत असल्याचे सांगत पोलिसांनी या जोडप्यांना तेथून हटवावे आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी असे आदेश दिले होते. परंतु हे पत्र माध्यमांच्या हाती लागल्यानंतर गुरुवारी दिवसभर पोलिसांच्या या भूमिकेने खळबळ उडाली होती. त्यामुळे पोलिसांनी नवीन भूमिका जाहीर केली. एकांत असलेल्या ठिकाणी जोडपी जातात तेथे गस्त वाढविली जाईल आणि त्यांना समाजकंटकांकडून त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असा बदल करण्यात आला आहे.

गुरुवारी काढलेल्या नव्या पत्रकाप्रमाणे प्रेमी जोडप्यांवर नव्हे तर त्यांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबईत नॅशनल पार्क, आक्सा चौपाटी, छोटा काश्मीर, मढ, गोराई, वर्सोवा आदी ठिकाणी असे प्रकार मोठय़ा प्रमाणावर घडतात. पोलिसांची गस्त वाढविली तर गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनाही आळा बसेल आणि जोडपीही अश्लील चाळे करणार नाहीत, असा दुहेरी उद्देश साध्य होईल.    
– अंबादास पोटे, पोलीस उपायुक्त