परस्परांवर टोकाची टीका आणि स्वबळावर लढण्याची भीमगर्जना करूनही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने अखेर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी युतीची घोषणा केली. लोकसभेसाठी शिवसेनेला २३ आणि भाजपला २५, तर विधानसभेसाठी मित्रपक्षांच्या जागा सोडून उरलेल्या जागांचे समसमान वाटप, या तत्त्वावर युती झाली आहे. युतीसाठी भाजपने एक पाऊल मागे घेतले असले तरी शिवसेनेला मोठय़ा भावाचा मान मात्र दिलेला नाही.

स्वबळावर निवडणुका लढवण्याचा ठराव जानेवारी २०१८ मध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केल्यानंतर वर्षभरापासून शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे सातत्याने भाजपवर, त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर सातत्याने आणि प्रसंगी शेलक्या भाषेतही टीका करत होते. मात्र, या सर्व भूमिका गुंडाळून ठेवत उद्धव ठाकरे युतीला राजी झाल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सायंकाळी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस, ठाकरे आणि शहा यांनी वरळी येथील पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली. या पत्रकार परिषदेमध्ये अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या भूमिका जाहिर केल्या. मात्र हिंदीमधून आपली भूमिका मांडताना फडणवीस यांच्या एका वाक्यावर पत्रकारांमध्ये चांगलाच हशा पिकला.

झालं असं की मराठीमध्ये आपली भूमिका स्पष्ट करुन झाल्यानंतर फडणवीस यांनी हिंदीमध्ये बोलण्यास सुरुवात केली. युतीचा इतिहास, राज्यातील प्रश्न, शेतकरी कर्जमाफी अशा बऱ्याच विषयांवर बोलल्यानंतर अखेर आपले म्हणणे संपवताना त्यांनी सेना-भाजपा मनापासून एकत्र आले आहेत हे हिंदीत सांगितले. यासाठी त्यांनी ‘हम लोगो ने सिंद्धांतिक रुप में मनसे एकसाथ आ कर’ असे शब्द वापरले आणि पत्रकारांमध्ये हशा फुटला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसलेले अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांनाही हसू फुटले. यानंतर मुख्यमंत्र्यांनीही हसत आपल्या शब्दांमध्ये सुधारणा केली. ‘मनसे नही मन से, माने दिल से’ असं म्हटलं. त्यावेळी उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांना ‘दिलसे’ अशा शब्द हसतच सुचवला. ‘दिलसे एक साथ आ कर| आप के मन मे जो मन है वो नाही| दिसले एक साथ आये है. हमारा मन एकदम साफ हैं| एकदम साफ मनसे एक अच्छा फैसला देश के हित मे किया हैं|’ असं सांगितलं.

दरम्यान गेल्या पाच वर्षांपासून सातत्यानं एकमेकांची उणीधुणी काढणाऱ्या शिवसेना आणि भाजपानं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युती करण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीचा फायदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला होऊ शकता असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. भाजप-शिवसेना युतीचा मनसेला राजकीय फायदा होऊ शकतो. भाजपबरोबर केलेली युती अनेक कडव्या शिवसैनिकांना मान्य झालेली नाही. भाजपने पाच वर्षे सातत्याने अपमान केला आणि गरज होती तेव्हा मदत घेतली, अशी शिवसैनिकांची व्यथा आहे. ‘भारत बंद’दरम्यान राज्यात प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या शहरांमध्ये मनसेच्या नावाचा जो काही बोलबाला झाला, त्याचीही मनसेला फायदा होऊ शकतो असे बोलले जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीची चर्चाही जोर धरत असताना राज ठाकरे कोणता राजकीय डाव खेळतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागून राहिले आहे.