न्याय्यहक्कांसाठी कष्टकरी, श्रमिकांची मुंबईला धडक; गोंधळाविना आझाद मैदानात दाखल

पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला, डोक्यावर रणरणतं ऊन, तीन दिवसांच्या पायपिटीने पायांना आलेली सूज.. अशा अवस्थेतही उराशी असलेल्या संतापाला वाचा फोडण्यासाठी हजारो आदिवासी शेतकरी गुरुवारी मुंबईत धडकले. प्रवासात झालेली आबाळ चेहऱ्यांवर दिसत असली तरी, त्यांच्या ‘चढाई’त कुठेही बेशिस्तपणाचा लवलेशही नव्हता.

आपापल्या गावपाडय़ांतून निघालेले हे कष्टकरी तीन दिवसांची पायपीट करून बुधवारी सकाळी मुलुंड नाका येथील आनंद मैदानावर पोहोचले. तेथून पूर्व द्रुतगती मार्गावरून १९ किलोमीटरचे अंतर कापत सायंकाळी सहा वाजता हा मोर्चा चुनाभट्टी येथील वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ पोहोचला. सायंकाळी झालेल्या सभेनंतर हाती असलेल्या शिध्यात पोटाचा प्रश्न मिटवून निद्रेच्या अधीन झालेले हे आदिवासी शेतकरी दुसऱ्या दिवशी, गुरुवारी भल्या पहाटेच दक्षिण मुंबईकडे रवाना झाले.

तीन दिवसांच्या मोर्चासाठी आणलेला सर्वच शिधा जवळपास संपत आलेला. सततच्या चालण्यामुळे पायाची चाळण झालेली. पण ‘आम्ही कसत असलेली जमीन मिळालीच पाहिजे’ हा निर्धार त्यांच्या सर्व वेदनांना पुरून उरत होता.  ‘३५ हून अधिक वर्षे झाली जमीन कसतोय. आमचं आयुष्य यातच गेलंय. आम्ही गाळलेल्या घामाची जमीन किमान आमच्या मुला-बाळांना तरी मिळावी’.. चाळीसगावच्या मुलताबाई सांगत होत्या.

नंदुरबारहून आलेले तानाजी खाजा पावरा यांचे तिनसमाड हे गाव. त्यांच्या आजूबाजूला १०० किलोमीटर अंतरावर दुसरे कोणतेच गाव नाही. सामाजिकदृष्टय़ा दुर्लक्षित अशा या गावात भौतिक सुविधांचीही वानवा. गावात साधारण ६०० कुटुंब आहेत. पण २० कि.मी अंतरावर जाऊन पाणी आणावे लागते. गावात पक्का रस्ता नाही. शाळा, आरोग्य सेवा नाहीत. त्यात वाघ, बिबटय़ा, लांडगा, रानडुक्कर अशा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे जगण्याचीही शाश्वती नाही. रोज कोणी ना कोणी घायाळ होत असते. गावाची अवस्था सुधारावी यासाठी तानाजी यांनी गल्लीपासून दिल्लीपासून पत्रव्यवहार केले. परंतु, त्याचा काहीच उपयोग झाला नाही, असे ते सांगतात. ते आपल्या तीन मुली आणि दोन मुलांसह मोर्चात सामील झाले आहेत.

जळगावच्या अंधारमल्ली गावातून आलेल्या पिची बाई म्हणतात की, आमची जमीन आम्हाला मिळाली नाही तर आम्ही इथून जाणार नाही. आमचा अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे. त्याशिवाय इथून हलणार नाही. त्यांच्यासोबत आलेल्या पवराबाई म्हणाल्या, ‘आमचा भाग हा दुष्काळग्रस्त आहे. आम्ही यंदा लावलेले पीक जळून गेले. शेतीतून काही मिळत नाही म्हणून आम्ही बऱ्याचदा दुसऱ्या गावात जाऊन किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन शेतात वा घरी मोलमजुरी करतो. त्यातून पोटापाण्याचा खर्च भागतो. पण ज्या दिवशी मजुरी नाही त्या दिवशी उपासमार ठरलेली.’

अख्खं कुटुंब मोर्चात

  • नंदुरबार येथील अक्कलकोवा गावातून आलेल्या वसंती सिंगा यांचे दहा जणांचे अख्खे कुटुंब घराला टाळे लावून या मोर्चात सामील झाले आहे. यांच्या कुटुंबातील मोठी मुलगी अकरावीला आहे. तिचे महाविद्यालय घरापासून २५ कि.मी अंतरावर आहे. ती आदिवासी असूनही शिष्यवृत्तीपासून वंचित आहे. आपल्या गावाचा सर्वागीण विकास व्हावा असे सिंगा कुटुंबाला वाटते. जमिनीवरील हक्कासोबतच गावात रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य मिळावे यासाठी ते पायपीट करीत येथे आले होते.
  • झुम्मा पशीर यांच्या वृद्ध ८० वर्षीय वडिलांच्या पायाला पायपिटीमुळे भेगा पडल्या होत्या. तरीही ते हट्टाने आले. कारण त्यांच्या समस्या तिथे मांडण्याची गरज होती, असे त्यांना वाटत होते. चपलांची सवय नसल्याने अनवाणीच पायपीट करीत पशीर मोर्चात आले. त्यांच्या १४ वर्षांच्या मुलाने मुंबईत आल्यावर पहिल्यांदा पक्का रस्ता, गाडय़ा, गर्दी, मोठय़ा इमारती पाहिल्या, हे पाहून बावरला होता. त्यांच्या भावाची बायको एक तान्हं बाळ घेऊन चालत होती. त्याच्या भविष्याकरिता पायपीट करीत ती शहरात आली होती. तिचेही पाय सुजलेले. खूप वेळ उपाशी राहिल्याने तिला भोवळ येत होती. पाण्याची सोय होती. पण ते पिऊन तरी किती वेळ राहणार? अशा परिस्थितीत स्वत:च्या हक्कांसाठी, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ती येथे आलेली होती.