डान्स बारच्या मुद्दय़ावर परवानगी देण्यावरून सध्या राज्य सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात नियमांवरून शर्यत सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरातील चार डान्स बार सुरू करण्याची परवानगी दिल्याने एकच गोंधळ उडाला. अखेर मुंबई पोलिसांनी ही परवानगी रद्द करण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र डान्स बार सुरू करण्यासाठी चुकीचा अहवाल पाठविणाऱ्या चार पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी ट्विटद्वारे जाहीर केले.
डान्स बार सुरू करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य सरकार आता पेचात सापडले आहे. सहा महिन्यांपूर्वी डान्सबार बद्दल सरकारने नियमावली तयार करत परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, यातील काही नियम रद्द अथवा शिथील करण्याचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने केल्याने या अधिवेशनात डान्स बार बंदीचा कायदा नव्याने आणण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे.