बारावीच्या निकालाचा टक्का वधारल्याने प्रवेशासाठी धडपड

यंदा बारावी निकालाचा टक्का वाढल्यामुळे चांगल्या महाविद्यालयांमधील कट ऑफ वाढणार आहे. यामुळे ७० ते ८० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. विज्ञान शाखेतील बहुतांश विद्यार्थी हे अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय शिक्षणाकडे वळतील. पण वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना मात्र प्रवेशासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

मुंबईतील महत्त्वाच्या महाविद्यालयांचा निकाल ९५ टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे. यामुळे महाविद्यालयातील ‘इनहाऊस कोटय़ा’मुळे पदवी महाविद्यालयांना जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्यानंतर उरलेल्या जागांवर बाहेरच्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल. त्यामुळे ही स्पर्धा आणखीच वाढणार आहे. मुंबई विभागाचा निकाल यंदा ८८.२१ टक्के इतका लागला आहे. या विभागातून तीन लाख १७ हजार ३२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी दोन लाख ७९ हजार ९०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. मात्र यंदा मंडळाच्या विभागांच्या यादीत मुंबईला शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. या विभागात राज्य मंडळात एकूण परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक २२ टक्के विद्यार्थी परीक्षा देतात तसेच येथे १७ नंबरचा अर्ज भरून बाहेरून परीक्षा देणाऱ्यांचे प्रमाणही जास्त असल्यामुळे विभागाची क्रमावरी खालावत असल्याचे शिक्षकांचे मत आहे.

कनिष्ठ महाविद्यालयाला जोडून शिकवणी वर्ग घेणारे तसेच केवळ शिकवणी वर्गात शिक्षण घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण शहरात दिवसागणिक वाढू लागले आहे. यामुळे विभागात १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षा देणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. या वर्षी राज्यभरातून ५० हजार ३५४ विद्यार्थ्यांनी १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षा दिली होती. यापैकी निम्म्याहून अधिक विद्यार्थी हे मुंबई विभागातील होते अशी माहिती समोर आली आहे. याचबरोबर हा विभाग मोठा असून विभागात ठाणे, रायगड, पालघर, मुंबई शहर, पूर्व उपनगर व पश्चिम उपनगर या जिल्हय़ांचा समावेश आहे. यामुळे या विभागाची हद्द मुंबई शहरापासून ठाण्यातील ग्रामीण भाग तसेच गुजरातच्या सीमेलगतच्या तलासरीपर्यंत जाते. यात शहराबरोबरच ग्रामीण भागही मोठय़ा प्रमाणावर आहे. यामुळे विभागाला शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागत असल्याचे हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे शिक्षक उदय नरे यांनी सांगितले. तर राज्याच्या एकूण विद्यार्थी संख्येच्या २२ टक्के विद्यार्थी हे या विभागातून बसतात. तसेच विभागात विविध स्तरांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल वाढला असून विभागीय क्रमवारीत मात्र तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागल्याचे विभागीय मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.

  • निकालाची शाखानिहाय टक्केवारी : विज्ञान – ९५.८५,
  • वाणिज्य – ९०.५७, कला – ८१.११, व्यवसाय अभ्यासक्रम – ८६.२७

chart  chart1