News Flash

भुजबळांचा असहकार

छगन भुजबळ यांना अटकेपूर्वी झालेल्या चौकशीत ३५ प्रश्न विचारण्यात आले.

सक्तवसुली संचालनालयाचा दावा; दोन दिवसांची पोलीस कोठडी

महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी अटकेपूर्वीच्या ११ तासांच्या चौकशीत काहीच सहकार्य केले नाही. सर्व प्रश्नांना मला माहिती नाही, असे उत्तर दिल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी केला. त्यामुळे त्यांना किमान तीन दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी ईडीने विशेष आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक (पीएमएलए) न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर न्यायालयाने भुजबळांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

छगन भुजबळ यांना अटकेपूर्वी झालेल्या चौकशीत ३५ प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी ‘मला माहीत नाही’ या उत्तराशिवाय काहीच सांगितले नाही. शिवाय बऱ्याच प्रश्नांवर त्यांनी मौन बाळगणेच पसंत केले, असे ‘ईडी’चे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले. महत्त्वाचे प्रश्न आणि त्यावर भुजबळांनी दिलेले उत्तर याचा तपशीलही त्यांनी न्यायालयात सादर केला. भुजबळ यांनी मालमत्तेचा स्रोताबाबत काहीच उत्तर दिले नाही. मोठय़ा प्रमाणात झालेल्या आर्थिक व्यवहाराविषयीही त्यांनी काहीही सांगितले नाही. चमणकर इंटरप्रायझेस तसेच अन्य कंपन्यांना दिलेल्या कंत्राटामध्ये त्यांचे नेमके काय हित होते, त्यांनी ही कंत्राटे त्यांनाच का दिली, याचा खुलासा भुजबळ यांनी केलेला नाही. त्याबाबत आपल्याला काहीच माहीत नसल्याचा दावा करत काहीही सांगण्यास नकार दिला. तसेच या सगळ्याचे खापर त्यांनी अन्य अधिकाऱ्यांच्या माथी मारले, असेही ‘ईडी’तर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.

भुजबळ कुटुंबीय ज्या ‘सॉलिटेर’ इमारतीत वास्तव्यास आहेत, त्या जागेच्या पुनर्विकासाचा करार परवेश कन्स्ट्रक्शनने मूळ मालकासोबत केला होता. मात्र जागेच्या मूळ मालकाला एक इंचही जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही; परंतु याबाबत आपल्याला काहीच माहीत नसल्याचा दावा भुजबळ करत असून तो न समजण्यापलीकडचा असल्याचा ‘ईडी’ने म्हटले आहे.

महाराष्ट्र सदनासह तीन प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली भुजबळ आणि अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. शिवाय त्यामध्ये आरोपपत्रही दाखल करण्यात आलेले आहे, परंतु एवढय़ा प्रक्रियेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला भुजबळांना एकदाही अटक करावीशी वाटली नाही. शिवाय महाराष्ट्र सदन प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला आहे. त्यामुळे ‘ईडी’ला आता नेमक्या कुठल्या पैशांचा शोध लावायचा आहे, असा सवाल भुजबळांच्या वतीने अ‍ॅड्. प्रसाद ढाकेफाळकर यांनी केला. त्यामुळे केवळ राजकीय सुडापोटी भुजबळांना अटक केल्याचा आरोपही त्यांनी केला. या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार म्हणून आधी समीर यांना अटक करण्यात आली. आता समीर यांच्या चौकशीचा हवाला देत भुजबळ हेच मुख्य सूत्रधार असल्याचे सांगत त्यांनाही अटक केली आहे. यापुढे पंकज आणि अन्य भुजबळ कुटुंबीयांना अटक केली जाईल. यातून भुजबळ यांच्यावर राजकीय सूड उगवण्यासाठीच ही कारवाई केली जात असल्याचे स्पष्ट होत असल्याचा दावाही ढाकेफाळकर यांनी केला. समीर यांचा रिमांड मागताना समीर हेच मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच भुजबळ यांनी मिळवलेल्या पैशांचा गैरव्यवहार समीर यांनी केल्याचे ‘ईडी’चे म्हणणे आहे. त्यामुळेच आर्थिक घोटाळ्याची भुजबळ यांना माहिती कशी असणार, असा सवालही ढाकेफाळकर यांनी उपस्थित केला. समीर वा भुजबळ या दोघांपैकी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा कुठलाही साक्षीदार नाही. त्यामुळे भुजबळ यांनी अमुक माहीत नाही असे सांगितले म्हणजे ते सहकार्य करत नाहीत, असे होत नाही.

उलट भुजबळ यांनी आतापर्यंत तपासात सहकार्यच केलेले आहे. त्यामुळे त्यांना अटक करायची गरज नाही. ते सकाळपासून रात्रीपर्यंत चौकशीसाठी येऊ शकतात. मात्र हृदयाचा त्रास असलेल्या व्यक्तीला कोठडीत ठेवून त्यांची प्रकृती बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत ढाकेफाळकर यांनी कोठडीला विरोध केला.

कशासाठी हवी कोठडी?

  • आर्थिक व्यवहार कसा झाला, त्याचा करविता धनी नेमका कोण, त्याचा स्रोत काय, या सगळ्याचा खुलासा करण्यासाठी भुजबळ आणि अटकेत असलेले समीर यांची समोरासमोर चौकशी करायची आहे.
  • भुजबळ फाऊंडेशनतर्फे आयोजित केलेल्या उत्सवांसाठी विकासक, बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदारांकडून देणग्या देण्यात आल्या आणि या देणग्या अडीच कोटी रुपयांपेक्षा कमी नव्हत्या.
  • याचा शोध लावण्यासाठीच भुजबळांची कोठडी हवी असल्याचे ‘ईडी’च्या वतीने अ‍ॅड्. हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले.

‘एमईटी’त पैसे मोजण्याचे यंत्र!

भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेला आर्थिक गैरव्यवहार हा ‘एमईटी’च्या माध्यमातून केला, असा दावा ‘ईडी’ने केला आहे. एमईटीच्या नवव्या मजल्यावर पैसे मोजण्याचे मशीनही होते. एमईटी आणि त्याचा एक माजी संचालक अमित बलराज याने हा खुलासा केला आहे. चौकशीदरम्यान ‘एमईटी’च्या संचालकांचे जबाब बहुतांशी बनावट असल्याचे आणि भुजबळांच्या सांगण्यावरूनच हे काम झाल्याचे निष्पन्न झाले आहे. संस्थेचे अध्यक्ष म्हणून भुजबळांना काहीच माहीत नसणे हे आश्चर्यकारक असल्याचे ‘ईडी’ने सांगितले.

महाराष्ट्र सदनाच्या कंत्राटावरून माझ्यावर अटकेची वेळ आली त्याचा निर्णय हा माझ्या एकटय़ाचा नव्हता, तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा होता. मी फक्त तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडली आणि त्यातून सरकारला फायदा करून दिला, त्यात माझे काय चुकले.

– छगन भुजबळ

राजकीय सूडबुद्धीने कोणाविरुद्धही कारवाई केली जाणार नाही, पण त्याच वेळी, पुरावे असल्यास कोणालाही मदत करणार नाही वा सोडणारही नाही. पैशांचा गैरव्यलोकसत्ता टीम वहार झाला असल्यास शासकीय यंत्रणांनी मूग गिळून गप्प बसावे किंवा हातावर हात ठेवून बसावे, अशी विरोधकांची अपेक्षा आहे का?

– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 5:14 am

Web Title: maharashtra sadan scam arrested ncp leader chhagan bhujbal sent to two days ed custody
Next Stories
1 घोटाळेबाजांना संरक्षण नाही!
2 बुडविलेल्या ८७० कोटी महसुलापैकी साडेसातशे कोटींचा शोध अद्याप नाहीच
3 पवारसमर्थक नेते कारवाईच्या फेऱ्यात
Just Now!
X