विक्रीची खोटी बिले देवून २०६० हवाला व्यापाऱ्यांनी सुमारे १६०० कोटी रुपयांचा विक्रीकर चुकविण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून या व्यापाऱ्यांना नोटीसा देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत दिली.
विरोधी पक्षनेते विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, रामनाथ मोते आदींनी हवाला व्यापाऱ्यांनी केलेल्या करोडो रुपयांच्या करचुकवेगिरीचा मुद्दा उपस्थित केला होता. शासनाची करोडो रुपयांची फसवणूक केली असताना कोणती पावले टाकली जात आहेत, अशी विचारणा त्यांनी केली. विक्रीची खोटी बिले देवून विक्रीकराची वजावट घेण्यात आली असल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे.  ही रक्कम वसूल करण्यासाठी त्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्यांना हवाला व्यापारी म्हणून घोषित करण्यात आले असून १८९५ व्यापाऱ्यांचे नोंदणी दाखले रद्द करण्यात आले आहेत, तर १६५ व्यापाऱ्यांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अन्य कायदेशीर कारवाई सुरु असल्याचेही पवार यांनी सांगितले.  हवाला व्यापाऱ्यांना देण्यात आलेल्या टीन क्रमांकाबाबत विक्रीकर विभागाचे संबंधित अधिकारी दोषी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.